माहितीच्या स्रोतावर नियंत्रण हवे !

इंटरनेटवरील माहितीचा मोठा स्रोत असलेल्या विकीपिडियाचा (संकेतस्थळाचा) यंदा २० वा वर्धापनदिन आहे. जगातील कोणत्याही प्रकारची, कुठल्याही विषयाची माहिती ३१६ भाषांमध्ये देऊ शकणारे हे ‘ऑनलाईन’ ग्रंथालयच आहे. २ दशकांपूर्वी एखाद्या विषयाची माहिती मिळवायची म्हणजे त्या क्षेत्रातील तज्ञ अथवा माहितीगार व्यक्तीकडून ती मिळवता येत असे अथवा ग्रंथालयात जाऊन त्या विषयाचे पुस्तक चाळून ती मिळवावी लागत असे. काही माहिती वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध व्हायची, तिची कात्रणे सांभाळून त्यांचा संदर्भासाठी उपयोग करावा लागत असे. अशी कात्रणे सांभाळून ठेवून त्यांचा वापर करणे यांसाठी चिकाटी आणि सातत्य मात्र लागते. तरी माहिती त्वरित शोधून मिळेलच असेही नाही.

विकीपिडियाचा अवाका

२० वर्षांपूर्वी चालू झालेल्या विकीपिडियाने माहिती मिळण्यातील पुष्कळशा अडचणी दूर केल्या. विकीपिडियाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तेथून माहिती घेता येते आणि आपल्याकडील माहिती त्यावर ठेवताही येते. त्यामुळे आपण आपल्याकडील संदर्भासहित असणारी माहिती तेथे ‘अपलोड’ करू शकतो. एखादी माहिती आपल्याला चुकीची वाटली, तर आपले आक्षेप तेथे नोंदवू शकतो आणि चुकीची माहिती काढून टाकण्यास बाध्य करू शकतो. त्यामुळे एक लेख शेकडो लोक संपादित करू शकतात. याच सुविधेमुळे संकेतस्थळ वादाच्या भोवर्‍यातही सापडले आहे. मूळ माहिती, नंतर त्यांचे खंडण, पुन्हा त्याचे खंडण असे अधिक वेळा चालू राहिल्यास तो लेख ‘लॉक’ केला जातो. त्यामुळे त्यावर संपादन करता येत नाही. ५ कोटींहून अधिक लेख सध्याच्या घडीला विकीपिडियावर आहेत. या लेखांची संपादनाची भव्यदिव्य प्रक्रिया सातत्याने चालूच असते. त्यामुळे वाचकाच्या माहितीत भर पडत रहाते.

हिंदूंवरील अत्याचार, हिंदु संघटना, संस्था अथवा साधू-संत यांच्याविषयी काही वाद उद्भवल्यास विकीपिडियाचा हात आखडतो. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याविषयी खोटेनाटे आरोप करून त्यांची अपकीर्ती करण्याची मोहीम चालवण्यात आली. त्याविषयी विरोधातील बातम्यांमधील माहिती ग्राह्य धरून विकीपिडियावर संस्था आणि समिती यांच्याविषयी नकारात्मक माहितीचाच भरणा अधिक असल्याचे दिसून येते. सनातन संस्थेकडून एवढ्या मोठ्या प्रमाणावर विश्‍वकल्याणाच्या चालू असलेल्या व्यापक कार्यासमोर संस्थेवर करण्यात आलेले आरोप नगण्य स्वरूपाचे असतांना त्या कार्याचा उल्लेख मात्र केलेला नाही. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याविषयी अन्य माहिती या पानांवर देण्याचा प्रयत्न केल्यावर अगदी काही वेळातच नव्याने टाकलेली माहिती पुसण्यात आली, असे लक्षात आले. सध्याच्या घडीला दोन संघटनांविषयी दिलेली काही माहिती वादग्रस्त संकेतस्थळांवरूनही घेण्यात आली आहे. त्यामुळे या माहितीवर नियंत्रण असलेल्यांनाच संस्थेची योग्य माहिती नाही आणि विकीपिडिया पहाणार्‍यालाही त्यामुळे एका आध्यात्मिक संस्थेची अत्यंत चुकीची माहिती (जणू ती आतंकवादी संघटना आहे, असे वाटेल) वाचण्यास मिळेल. याविषयी काहीतरी करणे आवश्यक आहे. अन्यथा चांगली माणसे, संघटना, संस्था या अपकीर्त होत रहातील.

हिंदूंची अपकीर्ती रोखणे आवश्यक

काही विषयांमध्ये जसे कोरोनाविषयक महामारीमध्ये संकेतस्थळाने माहितीतील अचूकता जपण्यासाठी आधुनिक वैद्य आणि तज्ञ यांचा चमू बनवून माहिती अचूक ठेवण्याचा कसोशीने केलेला प्रयत्न कौतुकास्पदच आहे. स्वयंसेवी संपादक असणार्‍या अशा माहितीजालावरील सत्यता संवेदनशील विषयांमध्ये जपणे तसे आव्हानात्मक काम आहे. नवी देहली येथे धर्मांधांकडून घडवून आणलेल्या दंगलींच्या वेळी हिंदूंची पुष्कळ हानी झाली, अनेक जणांच्या हत्या करण्यात आल्या. तरी मुसलमानांवर कसे अत्याचार झाले ?, याचेच चित्रण ‘२०२० देहली रायट्स’ या मथळ्याखालील माहितीत मिळेल. याचे कारण याविषयी माहितीचा मूळ स्रोत म्हणजे साम्यवादी वर्तमानपत्रांमधील बातम्या, धर्मांध लेखकांचे दिशाभूल करणारे लेख यांचेच संदर्भ अधिकृत म्हणून ग्राह्य धरण्यात आले आहेत. परिणामी जगाला नवी देहली येथील दंगलीत हिंदु अत्याचारी, तर धर्मांध अत्याचारग्रस्त अशी माहिती कळते. वास्तव मात्र अगदी उलट आहे ! हीच नेमकी अडचण आहे. त्यामुळे अंतिम नियंत्रण हे तत्त्वनिष्ठ व्यक्तीकडेच हवे. अन्यथा या माहितीचा पुरावा म्हणूनही उपयोग होऊ शकतो. भले विकीपिडियाने ‘प्राथमिक माहितीचा स्रोत म्हणून आमच्याकडे पाहू नका’, असे कितीदा सांगितले तरी.

सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे, असे सांगितले जाते. माहिती गोळा होणे आणि ती अचूक असणे महत्त्वाचे आहे. विकीपिडियासारख्या जगात पुष्कळ लोकप्रिय असलेल्या माध्यमांचे महत्त्व या पार्श्‍वभूमीवर वाढत असले, तरी त्यांना पूर्वग्रहाची झालर असल्याचे लक्षात येते. त्याच दृष्टीने ते विषयाची मांडणी करत असल्यामुळे अपकीर्तीच अधिक होते. भारत सरकारने आध्यात्मिक, हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याविषयी या मोठ्या माहितीजालावर योग्य माहिती उपलब्ध होण्यासाठी प्रयत्नशील रहाणे आवश्यक आहे.

अन्य काही वादग्रस्त सूत्रे असली, तरी सध्याच्या प्रत्येक माहितीवर पैसे आकारण्याच्या मानसिकतेच्या तुलनेत मुक्त आणि विनामूल्य माहितीकोष म्हणून विकीपिडियाचे काम पुष्कळ चांगले आहे. भारत स्वत: अनेक विद्या आणि ज्ञान यांचा खजिना आहे. अनेक गूढ विषयांची भारताला देण आहे, तसेच गूढ विषयांची माहिती असणारे अनेक अवलिया येथे आहेत. जगाला भारताच्या या ज्ञानाचे आकर्षण आहे. हे सर्व ज्ञान भारत सरकारने स्वतंत्र संकेतस्थळ चालू करून प्रसिद्ध करण्यास टप्प्याटप्प्याने प्रारंभ केल्यास एका मोठ्या विश्‍वकोष निर्मितीचे ते पहिले पाऊल होईल. भारताकडील आध्यात्मिक ज्ञानासह मानवी जीवनात उपयुक्त असे ज्ञान जगात पोचल्यावर जगाचे खर्‍या अर्थाने कल्याण होईल, यात शंकाच नाही.