पुरस्कार आणि तिरस्कार !

सध्याच्या स्थितीनुसार ‘पुरोगामी साहित्यिक’ हा चर्चेचा विषय झाला आहे. ‘साठी बुद्धी नाठी’ अशी म्हण असली, तरी पुरोगामी साहित्यिकांची बुद्धी सततच नाठाळ असते. अन्य कोणताही समाजघटक जेवढा संभ्रमित नसेल, तेवढे हे बुद्धीवादी साहित्यिक वैचारिकदृष्ट्या गोंधळलेले असतात. विद्रोही साहित्यिक यशवंत मनोहर यांनी नुकताच विदर्भ साहित्य संघाकडून त्यांना दिला जाणारा ‘जीवनव्रती पुरस्कार’ नाकारला आहे. कारण काय, तर पुरस्कार वितरण सोहळ्याच्या वेळी व्यासपिठावर श्री सरस्वतीदेवीची प्रतिमा ठेवण्यात आली होती. एकीकडे परिवर्तनाची भाषा बोलायची आणि वर्तन मात्र हेकेखोरवादी करायचे, हा मनोहर यांच्या वाणी आणि कृती यांतील मोठा भेद आहे. मनोहर यांचे साहित्य अभ्यासल्यास त्यांचे बहुतांश लिखाण समाजवादी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा पगडा आहे. डॉ. आंबेडकर यांनी मनुस्मृती का जाळली, विपश्यना का नाकारली ? आदी विषयांचा ऊहापोह मनोहर यांनी त्यांच्या लिखाणातून केला आहे. त्यांची भाषा हिंदु संस्कृतीच्या तिरस्काराची आहे. ‘स्त्रिया आणि शूद्रातिशूद्र यांना शिक्षण अन् ज्ञान बंदी करणार्‍या शोषणसत्ताकाची प्रतीके मी पूर्णतः नाकारलीच आहेत’, असे म्हटले आहे. श्री सरस्वतीदेवीच्या प्रतिमेला विरोध करतांना ती ज्ञानाची, विद्येची देवता आहे, याचेही भान मनोहर यांना राहू नये ?

ज्या आस्तिक समाजावर ते ठपका ठेवत आहेत आणि १५० हून अधिक वर्षांपूर्वी झालेल्या सामाजिक संघर्षासाठी आताचे वातावरण कलुषित करत आहेत, त्या संघर्षाचे आताचे वास्तव काय आहे ? ब्रिटीशकाळात त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे काही काळ सामाजिक वातावरण चिघळले असेलही; पण प्राचीन काळापासून तर तसे वातावरण नव्हते. वास्तविक आता स्वातंत्र्यपूर्व काळाच्या अगदी विरुद्ध परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात कर्नाटक सरकारने एक वेगळी घोषणा केली आहे. ‘स्वजातीतील गरीब पुजार्‍याशी विवाह करणार्‍या ब्राह्मण वधूला कर्नाटक सरकार ३ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य करणार आहे. वास्तविक सवलत, आरक्षण, आर्थिक साहाय्य यांची घटनेत तरतूद बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. सामाजिकदृष्ट्या मागे असलेल्या समाजघटकांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी ती तरतूद होती. तीच तरतूद आज ब्राह्मण समाजासाठी करावी लागत आहे. यामागचे संदर्भ मनोहर यांना वाचता येत नाहीत का ? आता कुठे शोषणाचे वातावरण राहिले आहे ? सरकारच गेली अनेक वर्षे ‘सर्व शिक्षण अभियान’ राबवत आहे. कुणीही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये, यासाठी प्रयत्न करत आहे. मागासवर्गीय विद्यार्थी, भटक्या जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलती असतात. सर्वच क्षेत्रांत आरक्षण आल्यामुळे असेल म्हणा किंवा काही ठिकाणी बुद्धीमत्तेच्या जोरावरही असेल; पण आता अनेक क्षेत्रांत मागासवर्गीय बांधव अधिकारी पदांवर दिसतात. ते मनोहर यांना दिसत नाही का ? त्यांची इहबुद्धी खरे सामाजिक वास्तव पहाण्यास त्यांना अडवते का ? परिवर्तनाची भाषा करणारे वास्तविक परिवर्तन होते, तेव्हा कोणती स्वत्नरंजने करत असतात ? ज्यांना झालेला पालट पहायचा नाही आणि जुनेच कढ काढत रहायचे आहे, अशांच्या सृजनशीलतेविषयी शंका घेण्यास वाव रहातो. त्यामुळेच त्यांनी पुरस्कार नाकारला, त्याचे कोणतेही वैषम्य वाटून घेण्याचे कारण नाही.

नामांकन अभ्यासपूर्ण हवे !

विदर्भ साहित्य संघाचे या प्रसंगात विशेष कौतुक वाटते. साहित्य संघाचे अध्यक्ष श्री. मनोहर म्हैसाळकर यांनी ‘श्री सरस्वतीदेवीची प्रतिमा हा साहित्य संघाच्या प्रथा-परंपरेचा भाग असून सभागृहाचे नावच ‘रंगशारदा’ आहे’, असे सांगितले. मनोहर यांच्या सांगण्यानंतरही साहित्य संघाने सरस्वतीदेवीचे स्थान व्यासपिठावर अबाधित ठेवले, त्यातून ते खरे ‘सारस्वत’ आहेत, हे त्यांनी दाखवून दिले. यापूर्वी चिपळूण येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपिठावर भगवान परशुरामाची प्रतिमा ठेवण्यासाठी धर्मप्रेमींना मोठा लढा द्यावा लागला होता. पुरोगाम्यांच्या दबावाखाली येऊन निमंत्रण पत्रिकेवरील परशुरामाचे चित्र आणि परशु त्या वेळी आयोजकांनी काढले होते. मोठी संघटना असूनही त्यांनी एक पाऊल मागे टाकले होते. विदर्भ साहित्य संघाने ज्या पद्धतीने या वेळी परिस्थिती हाताळली, ती कौतुकास्पद आहे. एक अवश्य सुचवावे वाटते, ज्यांचे विचार आपल्या विचारधारेच्या संपूर्णतः विरोधी आहेत, अशांना पुरस्कार देऊन नास्तिकतावादी विचारांना प्रोत्साहन कशाला द्यायचे ? पुरस्कारासाठी नामांकन करतांनाच त्यांच्या विचारधारेचा विचार झाला असता, तर कार्यक्रमात मिठाचा खडा पडला नसता.

पुरस्कार नाकारणे, यात नवीन काहीच नाही; मात्र तो कोणत्या कारणाने नाकारला जातो, हे पहाणे आवश्यक असते. आजपर्यंत अनेक कारणांनी अनेक पुरस्कार नाकारले गेले आहेत. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यांना मिळालेला पहिलाच फिल्मफेअर पुरस्कार नाकारला होता. त्या वेळी त्या मानचिन्हावर (ट्रॉफीवर) विवस्त्र महिला दर्शवण्यात आली होती. ‘हा माझ्यातील स्त्रीत्वाचा अवमान आहे’, असे सांगून लताताईंनी तो पुरस्कार नाकारला होता. त्यानंतर फिल्मफेअरने कपडे परिधान केलेली महिला असलेले मानचिन्ह बनवून वर्ष १९५८ मध्ये लताताईंना (गायिका लता मंगेशकर यांना) सन्मानित केले होते. कर्नाटक राज्यात शिक्षणक्षेत्रात भरीव योगदान दिलेल्या एका संतांना पद्म पुरस्कार घोषित झाला होता. ‘मी हे सर्व कार्य पुरस्कार आणि प्रसिद्धी यांसाठी करत नाही’, असे सांगून त्या संतांनी तो विनम्रतेने नाकारला होता. मनोहर यांच्या पुरस्कार नाकारण्यात अहंकाराचा दर्प आहे. मध्यंतरी मोदी सरकारच्या विरोधातही ‘पुरस्कारवापसी’ची टूम साहित्यिकांनी काढली होती. बौद्धिक क्षेत्रात वावरणार्‍यांना स्वतःच्या बुद्धीवर अधिक विश्वास असतो. समोर घडणारे वास्तव, त्याची पाळेमुळे स्वीकारण्याचे औदार्य त्यांच्यात नसते. त्यामुळेच साहित्यक्षेत्रात आज धर्मद्रोही आणि विद्रोहीच विचार अधिक प्रमाणात आढळून येतो. मनोहर आणि त्यांनी नाकारलेला पुरस्कार हे त्याचे केवळ प्रतीक आहे !