सोलापूर येथील सिद्धेश्‍वर यात्रेतील अक्षता सोहळा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर साधेपणाने

कोरोनामुळे मंदिराच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त

सोलापूर – येथील ग्रामदैवत सिद्धरामेश्‍वर यांच्या यात्रेत कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर घालण्यात आलेल्या नियमांचे पालन करत पारंपरिक अक्षता सोहळा मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत साधेपणाने पार पडला. योगदंड आणि कुंभार कन्या यांचा विवाह सोहळा होताच उपस्थितांनी सिद्धरामेश्‍वरांचा जयघोष केला. यंदा अक्षता सोहळ्यासाठी नंदीध्वज मिरवणुकीला अनुमती नसल्याने केवळ योगदंड घेऊन मानकरी सम्मती कट्ट्यावर पोचले. पारंपरिक बाराबंदी घालून मानकर्‍यांनी पालखीसह मंदिराच्या परिसरात प्रवेश केला. पालकमंत्री दत्तात्रेय भरणे आणि खासदार जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य हेही या सोहळ्यासाठी उपस्थित होते.

या सोहळ्यानिमित्त सम्मती कट्टा परिसर फुलांनी आकर्षक पद्धतीने सजवण्यात आला होता. या वेळी पालखीचे पूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रतिवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणारा हा सोहळा या वर्षी मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत आणि शासनाच्या नियमांचे पालन करत पार पडला. यात्रेनिमित्त सिद्धेश्‍वर मंदिराकडे येणारे सर्व रस्ते पोलिसांनी यापूर्वीच बंद केले होते, तसेच केवळ पास धारकांनाच या सोहळ्यासाठी सोडण्यात आले होते.