अशीही मागणी करावी लागणे, हे प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचे प्रतीक !
वैभववाडी – तालुक्यातील अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या (धरणाच्या) बुडित क्षेत्रात घर आणि भूमी जाऊनही त्याचा योग्य मोबदला मिळाला नाही, तसेच निवासी भूखंडाची ताबा पावती मिळालेली नाही. त्यामुळे आलेल्या निराशेतून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शांताराम नागप यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे नागप यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संबंधित अधिकार्यांवर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी ‘लढा संघर्षाचा, अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा’ या संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे यांनी केली आहे. (‘आधी पुनर्वसन, मग धरण’ असा शासनाचा नियम असतांना प्रकल्पांसाठी सर्वस्व देऊनही प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन न झाल्याने प्रकल्पग्रस्तांवर आत्महत्या करण्याची वेळ येत असेल, तर या आरोपांची सर्व स्तरांवर चौकशी होऊन संबंधितांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. प्रकल्पग्रस्तांना आलेल्या अशा वाईट अनुभवांमुळे आता कोणताही नवीन प्रकल्प आणायचा म्हटला, तरी जनता त्याला विरोध करते, हे लक्षात घ्या ! – संपादक)
तालुक्यातील अरुणा धरण प्रकल्पामुळे बाधित झालेल्या धरणग्रस्तांना देण्यात आलेल्या पुनर्वसन गावठण येथील भूखंडाची ताबा पावती मिळाली नाही. त्यामुळे वीजवितरण आस्थापनाकडून घरात विजेची जोडणी मिळत नाही. याविषयी संबंधित कार्यलयांचे उंबरठे झिजवूनही अधिकारी दाद देत नाहीत. घर, भूमी, झाडे यांचे योग्य मूल्यांकन झालेले नाही, असा आरोप करत अरुणा धरण प्रकल्पग्रस्त आखवणे गावातील शांताराम विठ्ठल नागप यांनी ६ जानेवारीला विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्यांना येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात भरती करण्यात आले; मात्र त्यांची प्रकृती अधिक चिंताजनक असल्याने त्यांना मुंबई येथील के.ई.एम्. रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या प्रकरणी वैभववाडी पोलिसांनी पीडितांचे जबाब घेतलेले आहेत; मात्र कार्यकारी अभियंता राजन डवरी यांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप ‘लढा संघर्षाचा, अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा’ संघटनेच्या पदाधिकार्यांनी केला आहे.