स्वातंत्र्यवीर सावरकर शाळेतील शैक्षणिक आरक्षण कायम ठेवावे !

शिक्षक-पालक प्रतिनिधी यांचे महापालिका प्रशासन आणि लोकप्रनिधी यांना निवेदन

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या महापौर सौ. गीता सुतार यांना निवेदन देतांना शिक्षक-पालक प्रतिनिधी

सांगली, १३ जानेवारी (वार्ता.) – सर्व्हे क्रमांक ३६३/२ या ६ सहस्र ६०० चौरस मीटर भूमीवरील स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानचे शाळेचे आरक्षण हटवून या भूमीचा रहिवासी क्षेत्रात समावेश करण्याविषयी शासनाने निर्णय दिला आहे. महापालिका आयुक्तांनी अधिसूचना काढून सदर विषयात सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. या जागेवर असलेले शैक्षणिक आरक्षण उठल्यास सदर जागी उपहारगृह, निवासी उपहारगृह, मद्यालय, व्यावसायिक बांधकाम होण्याची शक्यता आहे. याचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. तरी याचा विचार करता स्वातंत्र्यवीर सावरकर शाळेतील शैक्षणिक आरक्षण कायम ठेवावे, या मागणीचे निवेदन शिक्षक-पालक प्रतिनिधी यांनी महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना १२ जानेवारी या दिवशी देण्यात आले.

सांगली महापालिकेच्या बाहेर एकत्रित जमलेले स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान संचलित शाळेतील पालक-शिक्षक

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बालकांच्या शैक्षणिक हक्क कायदा २००९ मध्ये विद्यार्थ्यांना शारीरिक व्यायाम आणि खेळ यांसाठी शाळेजवळच मोकळे सुसज्ज क्रिडांगण शासनाने उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. त्यामुळे या भूमीच्या मालकी अधिकाराविषयी न्यायिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अथवा शासनाकडून या भूमीच्या मालकी हक्काविषयी फेर सर्वेक्षण पूर्ण होईपर्यंत आपण या भूमीवरील शैक्षणिक आरक्षण कायम ठेवावे.

सांगली परिसरातील वाढत्या नागरी विकासाचा विचार करता विशेषतः विश्रामबाग परिसर हा सर्वांत गतीने वाढत असून एकंदर सांगली-मिरज परिसराचा विचार करता मध्यवर्ती भाग होत आहे. त्यामुळे या भागातील विद्यार्थी संख्याही दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. याचा या भागातील सध्याच्या अपुर्‍या शैक्षणिक सुविधांचा विचार करता अशा सुविधा वाढवणे ही काळाची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत या भूमीवर असलेले शैक्षणिक आरक्षण उठवणे, हे मोठे विसंगत आणि भविष्यकाळाचा विचार करता गैरसोयीचे होईल.