दृष्ट काढण्यासंबंधी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘सनातनचे साधक समष्टी साधना करून ‘ईश्वरी राज्य’ स्थापन करण्यासाठी, तर वाईट शक्ती ‘आसुरी राज्य’ स्थापन करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. त्यामुळे वाईट शक्ती साधकांना विविध प्रकारे मोठ्या प्रमाणावर त्रास देतात. वाईट शक्तींचा त्रास हाही दृष्ट लागण्याचाच एक प्रकार होय. वाईट शक्तींच्या त्रासांमुळे साधकांना विविध प्रकारच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांना सामोरे जावे लागते. गत २० वर्षांपासून चालू असलेला हा सूक्ष्मातील देवासुर लढा आता अंतिम टप्प्यात पोचला आहे. त्यामुळे साधकांना होणार्या त्रासांत पुष्कळ प्रमाणात वाढ झाली आहे. साधकांना होणारे त्रास न्यून व्हावे, यासाठी त्यांची मीठ-मोहरीने दृष्ट काढण्यात आली. ‘दृष्ट काढणे’ या कृतीचा दृष्ट काढणारा आणि दृष्ट काढून घेणारा यांच्यावर होणारा परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन
६१ टक्के पातळीच्या साधकाने तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेची मीठ-मोहरीने दृष्ट काढली. दृष्ट काढण्यापूर्वी आणि नंतर दोघांची निरीक्षणे करण्यात आली. साधिकेतील त्रासदायक स्पंदने पूर्णत: नाहीशी होईपर्यंत, म्हणजे काही मिनिटांच्या अंतराने एकूण तीन वेळा तिची दृष्ट काढण्यात आली. प्रत्येक वेळी दृष्ट काढून ती प्रज्वलित अग्नीकुंडात टाकल्यावर ते अग्नीकुंड आणि त्यातून निघणारा धूर यांचीही निरीक्षणे करण्यात आली. दृष्ट काढणे या कृतीचा त्या सर्वांवर झालेला परिणाम पुढे दिला आहे.
वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’
जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.
१ अ. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्लेषण – ६१ टक्के पातळीच्या साधकाने तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेची दृष्ट काढल्याचा त्या दोघांवर, तसेच प्रज्वलित अग्नीकुंड अन् त्यातून निघणारा धूर यांच्यावर झालेला परिणाम
वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात येतात.
१. साधिकेची तीनदा दृष्ट काढल्याने तिच्या भोवतीची त्रासदायक स्पंदने पूर्णत: नाहीशी होणे
साधिकेची पहिल्यांदा दृष्ट काढल्यावर तिच्यातील ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा पुष्कळ न्यून झाल्या. तिची दुसर्यांदा दृष्ट काढल्यावर तिच्यातील ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा आणखी न्यून झाली आणि तिच्यातील ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली. तिची तिसर्यांदा दृष्ट काढल्यावर तिच्यातील ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जाही नाहीशी झाली. प्रत्येक वेळी तिची दृष्ट काढल्यावर तिच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली.
२. साधिकेची दृष्ट काढल्यावर दृष्ट काढणार्या साधकातील सकारात्मक ऊर्जा उत्तरोत्तर न्यून झाली.
३. साधिकेची दृष्ट काढून ती प्रज्वलित अग्नीकुंडात टाकल्यावर प्रज्वलित अग्नीकुंड आणि त्यातून निघणारा धूर यांच्यातील सकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यांच्यामध्ये उत्तरोत्तर अधिक नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.
२. निष्कर्ष
वरील निरीक्षणांतून व्यक्ती भोवतीची त्रासदायक स्पंदने पूर्णत: नाहीशी होईपर्यंत तिची दृष्ट काढणे आवश्यक आहे, हे लक्षात येते.
३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
३ अ. दृष्ट काढल्याने व्यक्तीचे स्थूलदेह, मनोदेह आणि सूक्ष्मदेह यांवर आलेले रज-तमात्मक आवरण (त्रासदायक स्पंदने) दूर होणे : व्यक्तीला दृष्ट लागल्याने तिच्याभोवती रज-तमात्मक आवरण (त्रासदायक स्पंदने) निर्माण होते. त्यामुळे तिच्या स्थूलदेह, मनोदेह आणि सूक्ष्मदेह यांवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. ज्या वेळी व्यक्तीचा स्थूलदेह रज-तमात्मक स्पंदनांनी भारित होतो, त्या वेळी ती शारीरिक व्याधींनी त्रस्त होते. शारीरिक व्याधींमध्ये तीव्र डोकेदुखी, कान ठणकणे, डोळे दुखणे, डोळ्यांपुढे अंधारी येणे, हाता-पायांना मुंग्या येणे, छातीत धडधडणे, हात-पाय गार पडून गळून जाणे इत्यादी त्रास होतात. दृष्ट काढल्याने तिच्या स्थूलदेह, मनोदेह आणि सूक्ष्मदेह यांवर आलेले रज-तमात्मक आवरण दूर होते. यामुळे व्यक्तीला होणारा त्रास उणावतो किंवा नाहीसा होतो.
३ आ. मीठ-मोहरीने दृष्ट काढण्याचे महत्त्व : मीठ आणि मोहरी यांनी दृष्ट काढली असता स्थूलदेहावरील रज-तमात्मक आवरण (त्रासदायक स्पंदने) मिठाच्या साहाय्याने खेचले जाऊन ते मोहरीमध्ये वेगवान लहरींच्या साहाय्याने घनीभूत होऊन नंतर अग्नीच्या साहाय्याने जाळून नष्ट केले जाते. त्यामुळे व्यक्तीला होणारा त्रास उणावतो किंवा नाहीसा होतो.
३ इ. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेची एकूण तीन वेळा दृष्ट काढल्यानंतर तिच्यातील त्रासदायक स्पंदने पूर्णत: नाहीशी होणे : यातून तिला असलेल्या वाईट शक्तींच्या त्रासांची तीव्रता लक्षात येते, तसेच तिला होणारे त्रास दूर होण्यासाठी ‘तिची एकदा दृष्ट काढणे’ पुरेसा उपाय नसून तिच्या भोवतीची त्रासदायक स्पंदने पूर्णत: नाहीशी होईपर्यंत तिची दृष्ट काढणे आवश्यक आहे, हे लक्षात येते. (तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या अन्य २ साधकांचीही ३ वेळा दृष्ट काढल्याने त्यांच्यातील नकारात्मक स्पंदने पूर्णत: नाहीशी होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाल्याचे दिसून आले.)
३ ई. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेची दृष्ट काढल्यानंतर दृष्ट काढणार्या साधकातील सकारात्मक ऊर्जा थोडी न्यून होण्याचे कारण : तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेची दृष्ट काढतांना दृष्ट काढणार्या साधकाच्या हातांच्या मुठीत असलेल्या मीठ-मोहरीकडे साधिकेभोवती असलेली त्रासदायक स्पंदने खेचली गेली. याचा दृष्ट काढणार्या साधकावर काही प्रमाणात परिणाम झाला. त्यामुळे त्याच्यातील सकारात्मक ऊर्जा थोडी न्यून झाली.
३ उ. दृष्ट काढून ती प्रज्वलित अग्नीकुंडात टाकल्यानंतर अग्नीकुंड आणि त्यातून निघणारा धूर यांच्यातील सकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यांच्यामध्ये उत्तरोत्तर अधिक नकारात्मक ऊर्जा निर्माण होणे, यामागील कारण : साधिकेची सलग तीनदा दृष्ट काढतांना तिच्यातील त्रासदायक स्पंदने अधिकाधिक प्रमाणात मीठ-मोहरीकडे खेचली गेली. दृष्ट काढून ती प्रज्वलित अग्नीकुंडात टाकल्यावर त्यातील त्रासदायक स्पंदने अग्नीच्या साहाय्याने जळून नष्ट होण्याची प्रक्रिया आरंभ झाली. मीठ-मोहरीत खेचल्या गेलेल्या त्रासदायक स्पंदनांचे प्रमाण आणि प्रभाव उत्तरोत्तर अधिक असल्याने ती अग्नीद्वारे नष्ट होतांना त्याचा परिणाम प्रज्वलित अग्नीकुंड अन् त्यातून निघणारा धूर यांवर प्रतिबिंबीत झाला. यामुळे त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यांच्यामध्ये उत्तरोत्तर पुष्कळ नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१३.११.२०२०)
ई-मेल : [email protected]
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |