नगर येथील तत्कालीन नगरसेवक श्रीपाद छिंदम यांचे नगरसेवकपद रहित करण्याचा निर्णय संभाजीनगर खंडपिठाने वैध ठरवला !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अनुद्गार काढल्याचे प्रकरण

नगर – येथील महापालिकेचे तत्कालीन नगरसेवक श्रीपाद शंकर छिंदम यांनी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अनुद्गार काढले होते. याविषयी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने महापालिकेच्या शिफारसीवरून छिंदम यांचे रहित केलेले नगरसेवकपद मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने वैध ठरवले आहे. खंडपिठात छिंदम यांनी प्रविष्ट केलेली याचिका फेटाळून न्यायालयाने राज्य शासनाच्या कारवाईस योग्य ठरवले आहे.


नगरसेवक असलेले छिंदम यांनी १६ फेब्रुवारी २०१८ या दिवशी महापालिकेचे अधिकारी अशोक बिडवे यांना शिवीगाळ करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. यासंबंधीचे संभाषण सर्वत्र प्रसिद्ध झाले होते. छिंदम यांच्यावर नगर येथील तोफखाना पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान संहिताच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरणारे श्रीपाद छिंदम

महापालिकेच्या वतीने विशेष सभा बोलावून २६ फेब्रुवारी २०१८ या दिवशी त्यांचे नगरसेवकपद रहित करण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. संबंधित ठराव अंतिम मान्यतेसाठी राज्याच्या नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आला. राज्य शासनाने २७ फेब्रुवारी २०२० या दिवशी त्यांचे नगरसेवकपद रहित केले होते.