सांगली, ८ जानेवारी (वार्ता.) – श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने होणार असलेल्या राम मंदिराचे काम आता प्रगतीपथावर आहे. यासाठी देशातील बहुसंख्य नागरिकांचा सहभाग असावा, या उद्देशाने विश्व हिंदु परिषदेच्या वतीने १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारीअखेर निधी समर्पण अभियान राबवण्यात येणार आहे. जगाच्या सांस्कृतिक राजधानीचे स्वरूप अयोध्येला येणार आहे. या कार्यासाठी निधीची आवश्यकता आहे. यासाठीच हे अभियान राबवण्यात येणार आहे, अशी माहिती विश्व हिंदु परिषदेचे अखिल भारतीय संयुक्त महामंत्री श्री. दादा वेदक यांनी ८ जानेवारी या दिवशी पत्रकार परिषदेत सांगली येथे दिली.
१. पंतप्रधानांनी ५ ऑगस्ट या दिवशी रामजन्मभूमीच्या जागी भूमी आणि शीला पूजन करून कार्याचा शुभारंभ केला. प्रस्तावित राम मंदिर तीन मजल्यांचे असणार आहे. प्रत्येक मजल्याची उंची २० फुटांची असणार आहे. मंदिराची एकूण उंची १६१ फूट, लांबी ३६० फूट आणि रूंदी २३५ फूट असणार आहे. संपूर्ण मंदिर दगडी बांधकामात असणार आहे.
२. मंदिर २.७ एकरवर उभारले जाणार असून परिसरात यज्ञशाळा, सत्संग भवन, संग्रहालय, संशोधन केंद्र, प्रदर्शन, अतिथी भवन आदींची उभारणी करण्यात येणार आहे. ३ वर्षांत हे कार्य पूर्ण होणार आहे.
३. काश्मीर ते कन्याकुमारी आणि सोमनाथ ते मेघालयापर्यंतच्या श्रद्धांच्या सेतूबंधांनी मंदिर उभे रहाणार आहे. यासाठी देशातील ४ लाख गावात आणि ११ कोटी कुटुंबांत रामभक्त संपर्क करणार आहेत. संपूर्ण व्यवहारात आर्थिक पारदर्शकता ठेवली जाणार आहे.
४. राज्यातील ४८ सहस्र गावांतील अडीच कोटी कुटुंबापर्यंत ५ सहस्र संत, तसेच अडीच लाख रामभक्त संपर्क साधणार आहेत.
सांगली जिल्ह्यातील ५५० गावांमध्ये साडेपाच लाख कुटुंबांपर्यंत पोचवण्याचे उद्दिष्ट
सांगली जिल्ह्यातील ५५० गावांमध्ये साडेपाच लाख कुटुंबांपर्यंत पोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यात जिल्ह्यातील रामभक्त कार्यकर्ते पूर्णवेळ अभियानाचे लक्ष्य गाठण्यासाठी कार्यरत रहाणार आहेत, अशी माहिती श्री. वेदक यांनी दिली. पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह श्री. नितीन देशमाने आणि आभार प्रदर्शन श्री. संजीव चव्हाण यांनी केले. या वेळी जिल्हा संघचालक श्री. विलास चौपाई, अभियान प्रमुख श्री. सुहास जोशी, श्री. संजीव चव्हाण उपस्थित होते.