अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘वर्ष २०१९ मध्ये झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत मला वक्ता म्हणून सेवा मिळाली होती. त्या वेळी सभेत वक्ता म्हणून भाषण करायचे नसून ‘त्या माध्यमातून देवालाच अनुभवायचे आहे’, असा भाव ठेवून माझ्याकडून प्रयत्न झाले होते आणि त्याचाच मला पुष्कळ आनंद मिळाला होता. तोच आनंद मला वर्ष २०२० मध्ये होणार्‍या जळगाव येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या वेळीही घ्यायचा होता.

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

१. सभेच्या आधी तीव्र शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास होणे अन् नामजपादी उपाय आणि भाषणाची सिद्धता करतांना मनात नकारात्मक विचार येणे

मला सभेच्या आधी शारीरिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही प्रकारचे तीव्र त्रास होत होते. आधी ठरलेले असल्यामुळे ‘सभेला जायचेच’, असे मला वाटत होते. सभेआधी जळगावला पोचल्यावरही मला त्रास झाले. नामजपादी उपाय आणि भाषणाची सिद्धता करतांना ‘यावर्षी आपण कुठेच सभेत वक्ता म्हणून गेेलेलो नाही. जमेल ना ?’, असा विचार माझ्या मनात दोनदा आला. ‘तो बुद्धीच्या स्तरावर असेल’, असे वाटून दृष्टीकोन देऊन मी पुन्हा माझ्या हातातली सेवा पूर्ण करण्यामागे लागलो; परंतु माझ्या मनात तोच विचार तिसर्‍यांदा आला. तेव्हा मात्र ‘काहीतरी होत आहे’, असे मला वाटले.

२. या काळात झालेल्या जाणिवा

२ अ. पहिली जाणीव : भाषणाचे शब्द ब्रह्मांडातून येणार आहेत.

२ आ. दुसरी जाणीव : अनंताचा हात माझ्या पाठीशी आहे. (हे ‘पाठीशी’ हा शब्द ‘आकाशातून आला आहे’, अशी ती जाणीव होती.)

अंदाजे १२ वर्षांपूर्वी माझ्या विधीज्ञाच्या (वकिलीच्या) अंतिम परीक्षेच्या काळात एका पेपरच्या काही काळ आधी ‘अनंताचा हात माझ्या पाठीशी आहे’, ही जाणीव मला झाली होती. त्यानंतरच्या काळात असे कधीच जाणवले नव्हते. ते मला जळगाव सभेच्या आधी प्रकर्षाने जाणवले.

हे झाल्यावर माझे मन पुन्हा निश्‍चिंत झाले आणि मला वाटले, ‘जे त्रास होत आहेत, ते संपण्याची प्रक्रिया सभेतूनच आरंभ होणार आहे. भाषणाच्या वेळी भगवंताचे जे चैतन्य मिळेल, त्यातून ते होणार आहे.’

३. सभास्थळी वक्त्यांचे स्वागत ढोल आणि तुतारी यांच्या निनादात चालू असतांना भाव जागृत होणे अन् ‘स्वतःने सभेचे पूर्ण अवकाश व्यापून टाकले आहे’, असे जाणवून पुष्कळ आनंद होणे

सभेच्या वेळी वक्त्यांचे स्वागत ढोल आणि तुतारी यांच्या निनादात होणार होते. सभास्थळी पोचल्यावर तसे स्वागत चालू झाले आणि माझा भाव जागृत झाला. मला जाणवू लागले, ‘मी गर्दीतून वाद्यांच्या निनादातून चालत आहे आणि मी सभेचे पूर्ण अवकाश व्यापून टाकले आहे.’ मला असा पुष्कळ एक आनंद व्यापून राहिला होता. हीच जाणीव सभेआधीचे वेदमंत्रपठण आणि शंखनाद यांच्या वेळीही मला झाली.

४. सभेनंतर पुन्हा मुंबईत आल्यानंतर त्रास हळूहळू उणावत गेला.

५. सभेनंतर जळगावहून आल्यावर साधकाला अनेकदा झालेली जाणीव

५ अ. ‘महाशून्य’ हा नामजप करत असतांना ‘मी’ची जाणीव होणे आणि ‘आज्ञाचक्र अन् ब्रह्मरंध्र येथे चांगल्या संवेदना आणि श्‍वासाच्या समवेत होणारा जप’ इतकेच अस्तित्व रहाणे : संध्याकाळी सर्व महत्त्वाच्या सेवा संपल्यानंतर मी कार्यालयात ‘महाशून्य’ हा नामजप करत बसत असे. हा नामजप अत्यंत चांगला होत होता. ‘जप शरिरात जात आहे’, असे मला वाटत होते. आपल्याला आपल्या शरिराची, तसेच त्यावरील कपडे आणि केस यांच्या कडांची एक सूक्ष्म जाणीव असते. ती जाणीव हवेचा स्पर्श किंवा तत्सम स्पर्शातून होत असते. आपल्याला त्याची सवय झालेली असते.

अनेकदा ‘महाशून्य’ हा जप करतांना ‘मी’ची ही कडा विस्तारत गेल्याचे मला जाणवत होते. ‘मी म्हणजे वीरेंद्र इचलकरंजीकरचे शरीर नसून माझ्या दोन्ही बाजूंना अजून ५ – ६ जण (म्हणजे एकूण १० – १२ जण) असावेत’, इतकी ‘मी’ची जाणीव पसरलेली आहे. ‘मी’ची ती कड या टोकापासून त्या टोकापर्यंत आहे’, असे मला जाणवत असे. ‘आज्ञाचक्र आणि ब्रह्मरंध्र येथे चांगल्या संवेदना अन् श्‍वासाच्या समवेत होणारा जप’ इतकेच अस्तित्व रहात असे.

५ आ. आगगाडीतून प्रवास करतांना ‘श्रीविष्णुसहस्रनाम’ ऐकतांना त्यातील ‘ब्रह्म’ हा शब्द ऐकल्यावर मिटल्या डोळ्यांसमोर जणू ब्रह्मांड दिसणे, व्यापकतेची जाणीव होणे आणि डोळे उघडल्यावर स्वतः आगगाडीत असल्याचे लक्षात येणे : कार्यालयातून बाहेर पडल्यावर आगगाडी स्थानकाकडे चालत जातांनाही हीच एक व्यापक ‘मी’ची जाणीव रहात असे. १०.३.२०२० या दिवशी संध्याकाळी मी कार्यालयातून बाहेर पडलो. जातांना आगगाडीतून ‘श्रीविष्णुसहस्रनाम’ ऐकत होतो. आगगाडीत बसलो होता, तो एक व्यापक मी होता. ‘श्रीविष्णुसहस्रनाम’ ऐकतांना डोळे मिटलेले होते आणि श्‍वासाची जाणीव होती. ‘श्रीविष्णुसहस्रनाम’ ऐकतांना मधेच ‘ब्रह्म उवाच’ हा शब्द आला आणि एकदम काहीतरी घडले.

‘ब्रह्म’ म्हटलेला तो आवाज नव्हता, तसेच शब्दातला नाद नव्हता. तो एकप्रकारे पाण्यात खडा टाकला, तर पृष्ठभागावर तरंग उठतो अन् पुढे पसरत जातो, तसा शब्द होता. त्याला नाद नव्हता; परंतु त्याची जाणीव होती. तो शब्द सगळीकडे पसरत गेला आणि मला मिटल्या डोळ्यांसमोर जणू ब्रह्मांड दिसले. त्यात हालचाल नव्हती, तर प्रकाश होता. तो प्रकाशही शांत होता. नीरव शांतता होती. ‘शांतता काय असते ?’, त्याची ती अंतिम जाणीव होती. ती शांतता अद्भुत होती. मीही असा व्यापक होतो. जे दिसत होते, ते या डोळ्यांंना दिसतच नव्हते. एका व्यापकतेची ती जाणीव आणि दृश्य होते. ते शब्दांत सांगणे कठीण आहे. ते सर्व इतके स्पष्ट होते की, जेव्हा ते संपले आणि मी डोळे उघडले, तेव्हा मला ‘अरे, मी आगगाडीमध्ये आहे’, असे माझ्या लक्षात आले.’

– अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद. (१५.४.२०२०)

• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक