भोंदवडे आणि आंबवडे गावांचा सर्व निवडणुकांवर बहिष्कार

प्रशासकीय मतदारसूचीतच सावळा गोंधळ होत असेल, तर निवडणूक योग्य प्रकारे कशी पार पडणार ?

मतदारसूचीतच सावळा गोंधळ

सातारा, ५ जानेवारी (वार्ता.) – भोंदवडे आणि आंबवडे गावातील शेकडो मतदारांच्या नावांचा घोळ झाल्यामुळे ग्रामस्थांना अडचणी येत आहेत. याविषयी जिल्हा प्रशासनाकडे अनेकदा तक्रार देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे भोंदवडे आणि आंबवडे ग्रामस्थांनी येथून पुढील सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.
याविषयी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. काही ठिकाणी चुकीच्या मतदार सूचीमुळे जटील प्रश्‍न निर्माण झाले आहेत. भोंदवडे येथील अनुमाने २५० नावे आंबवडे गावाच्या सूचीत गेली आहेत. त्यामुळे आंबवडे गावातील २५० हून अधिक नागरिकांची नावेच मतदारसूचीत नहीत, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे, तर भोंदवडे येथील मतदारसूचीत चुकून २५० नावे आल्यामुळे विविध अडचणी निर्माण होत आहेत. जोपर्यंत ही नावे सुयोग्य पद्धतीने त्या-त्या गावांच्या सूचीत समाविष्ट होत नाहीत, तोपर्यंत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत, लोकसभा, विधानसभा अशा विविध निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.