भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या मोरजी, पेडणे, गोवा येथील श्री भूमिकादेवीचा जत्रोत्सव !

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तुते ॥

मोरजी, पेडणे येथील श्री देवी मोरजाई संस्थान आणि संलग्न देवालये यांच्या अधिपत्याखाली असलेले श्री देव सत्पुरुष हे मुख्य देवस्थान, श्री देवी मोरजाई, श्री देव ब्राह्मण, श्री देवी भूमिका, श्री देव भैरव ही पंचायतन देवस्थाने गावातील लोकांची मुख्य श्रद्धास्थाने होय. अशा या पंचायतनातील एक श्री भूमिकादेवीचा जत्रोत्सव बुधवार, ६ जानेवारी २०२१ या दिवशी साजरा होत आहे. त्यानिमित्त मंदिराची ऐतिहासिक माहिती येथे प्रसिद्ध करत आहोत.

श्री भूमिकादेवी

श्री देवी सातेरी किंवा भूदेवी अर्थात भूमिकादेवीची उपासना आपल्या इच्छित प्राप्तीसाठी करतात. प्राचीन काळापासून भूदेवीची उपासना दृढ श्रद्धेने केली जाते. ज्या ज्या ठिकाणी श्री भूमिकादेवी, सातेरी, भूदेवी इत्यादी नावाने देवीची मंदिरे आहेत, ती सर्व परशुरामाने निर्माण केली, असे आपण मानतो. अतीप्राचीन काळी परब आणि गावस या कुटुंबियांनी भूमिकेची प्रतिष्ठापना केली. हाच मोरजीतील आणि तेव्हाच्या मयुरग्रामातील ग्रामरचनेचा प्रारंभ होय.

दहाव्या शतकाच्या काळात मोरजीतील पंचायतनातील मूर्तीची पुन्हा स्थापना झाल्यानंतर मूळ देवी अदिती, तिचे रूप रेणुका या देवतांचा विचार करून देवीची चतुर्भूज मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली. देवीच्या दोन हातांमध्ये नाग, उजव्या हातामध्ये तलवार आणि डाव्या हातामध्ये एक पुरुष आहे. देवीच्या उजव्या बाजूला ब्राह्मण, नितकारी आणि पूर्वच्यारी, मंदिराच्या डाव्या बाजूला राम गावस अन् पुढे पुरुषाचे लहान मंदिर आहे. तसेच उजव्या बाजूला पूर्वीचा महार यांची लहान घुमटी आहे. मंदिराच्या समोर दोन्ही बाजूला कोष निरंकाराच्या दोन लहान घुमट्या आणि एक पूर्वार आहे. ग्रामरचनेनंतरची प्रथम आणि प्रधान देवता, असा हिचा लौकिक आहे.

अशा या नवसाला पावणार्‍या श्री भूमिकादेवीचा प्रमुख उत्सव म्हणजे जत्रोत्सव. मोरजीतील परब, शेटगावकर श्री भूमिकादेवीला आद्यदैवत मानतात. गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक इत्यादी राज्यांतून भाविक देवीच्या दर्शनासाठी भक्तीभावाने उपस्थित राहून या उत्सवात सहभागी होतात, अशा या देवीच्या चरणी शरणागत भावाने नमस्कार !

जत्रोत्सवाच्या कालावधीत कोरोनाविषयीचे नियम पाळण्याचे आवाहन

यावर्षी जत्रोत्सव कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर साध्या पद्धतीने कोरोनाविषयीचे नियम पाळून साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे जत्रोत्सवाच्या दिवशी भाविकांनी गर्दी न करता कोरोनाविषयीचे नियम पाळून दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

– श्री भूमिकादेवी संस्थान समिती, मोरजी, गोवा.


देवाला साष्टांग नमस्कार कसा घालावा ?

देवाच्या मूर्तीसमोर पुरेसे मोकळे स्थान (जागा) असल्यास देवाला साष्टांग नमस्कार घालणे इष्ट असते. येथे शास्त्रशुद्ध साष्टांग नमस्कार कसा घालावा, याचे वर्णन केले आहे. हे वाचून अनेकांना देवळात, गणेशोत्सवात आरतीनंतर आदी प्रसंगी योग्य प्रकारे साष्टांग नमस्कार घालण्याची प्रेरणा मिळेल !

१. विधीवत साष्टांग नमस्कार म्हणजे काय ?

उरसा शिरसादृष्ट्या मनसा वचसा तथा ।
पद्भ्यां कराभ्यां जानुभ्यां प्रणामोऽष्टांगमुच्यते ।

अर्थ : १. छाती, २. शिर (डोके), ३. दृष्टी (डोळ्यांनी नमस्कार करणे), ४. मन (मनाने नमस्कार करणे), ५. वाचा (‘तोंडाने’ नमस्कार असे म्हणणे), ६. पाय, ७. हात आणि ८. जानु (गुडघे), भूमीला टेकवून नमस्कार करणे म्हणजे साष्टांग नमस्कार.

२. कृती

अ. साष्टांग नमस्कार घालतांना प्रथम दोन्ही हात छातीशी जोडून कटीत (कमरेत) वाकावे आणि त्यानंतर ओणवे होऊन दोन्ही हात भूमीवर टेकवावेत.

आ. आधी उजवा, मग डावा पाय मागे ताणून सरळ लांब करावा.

इ. हातांचे कोपरे दुमडून डोके, छाती, हात, गुडघे नि पायांची बोटे भूमीला टेकतील, असे आडवे पडावे आणि डोळे मिटावेत.

ई. मनाने नमस्कार करावा. मुखाने ‘नमस्कार’ असे उच्चारावे.

उ. उभे राहून छातीशी हात जोडून भावपूर्ण नमस्कार करावा.

(संदर्भ : सनातन-निर्मित लघुग्रंथ ‘नमस्काराच्या योग्य पद्धती’)