नागपूर येथील विधानभवनात विधानमंडळ सचिवालयाच्या कायमस्वरूपी कक्षाचे उद्घाटन
नागपूर – देशात सध्या केंद्रीकरण चालू आहे. सर्वच आपल्या हातात हवे असे चालू आहे. असे असतांना आपण मात्र राज्यात प्रशासनाचे विकेंद्रीकरण करत आहोत. शेतकर्यांना कर्जमुक्त करणे हे सूत्र आपण तळमळीने घेतले आहे. मी विदर्भवासियांना वचन देतो की, तुमच्यावर अन्याय होणार नाही. कुणी अन्याय करत असेल, तर ढाल बनून उभे राहू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. येथील विधानभवनात विधानमंडळ सचिवालयाच्या कायमस्वरूपी कक्षाचे ४ जानेवारी या दिवशी उद्घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. नागपूर करारानुसार वर्षातील ३ अधिवेशनांपैकी एक म्हणजे हिवाळी अधिवेशन उपराजधानी नागपूरमध्ये घेण्याची चालू झालेली परंपरा संसदीय लोकशाहीत वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे.
मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राचे हे ६० वे वर्ष आहे. आपण गेल्या वर्षी १ मे हा दिवस ‘महाराष्ट्र स्थापना दिन’ म्हणून साजरा करणार होतो; पण कोरोनाचे संकट आले. विदर्भ हा महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे. आता अभिमान आहे की, प्रतिकूल काळात इथे कायमस्वरूपी कक्ष निर्माण झाला आहे. विकास हा विधान भवनातून होत असतो. विनाकारण मुंबईला करावी लागणारी ये-जा या कक्षामुळे बंद होणार आहे.