वेरे, गोवा येथील श्री शांतादुर्गा नेर्लेकरीण देवीचा कालोत्सव !

१६ व्या शतकात ख्रिस्ती मिशनर्‍यांनी केलेल्या अत्याचारांमुळे गोव्यातील धार्मिक वातावरण बिघडून गेले होते. धार्मिक छळामुळे पोर्तुगिजांच्या अमलाखाली असलेल्या बार्देश तालुक्यातील बहुतेक देवालयांतील मूर्तींचे फोंडा आणि पेडणे या सुरक्षित तालुक्यांत स्थलांतर करण्यात आले.

बार्देश तालुक्यातील नेरुल या खेड्यातील श्री शांतादुर्गादेवीला वेरे, तसेच नेरुल या गावांतील हिंदू मोठ्या भक्तीने भजत होते. कै. कृष्णा शेणवी नेर्लेकर या घराण्याची ती कुलदेवता मानली जात होती. पोर्तुगिजांकडून ‘इन्क्विझिशन’द्वारे हिंदूंची मंदिरे आणि मूर्ती यांची होणारी तोडफोड टाळण्यासाठी वेरे आणि नेरुल येथील हिंदूंनी श्री शांतादुर्गादेवीला पेडणे येथील मांद्रे या गावात स्थलांतरित केले. या ठिकाणी एक छोटीशी देवळी बांधण्यात आली. कै. कृष्णा शेणवी नेर्लेकर हे या कुटुंबाचे शेवटचे पुरुष असल्यामुळे त्यांच्यानंतर येथील भक्तांनी त्यांच्या या ग्रामदेवतेची सेवा करण्याचे दायित्व स्वीकारले. सुमारे चार शतके वेरे आणि नेरुल येथील भाविक मांद्रेपर्यंत चालत जाऊन देवीचे दर्शन घ्यायचे. तसेच मार्गशीर्ष पंचमीला होणार्‍या धार्मिक उत्सवात आणि कालोत्सवातही सहभागी व्हायचे. मांद्रे हे ठिकाण पुष्कळ दूर असल्यामुळे त्यांनी वेरे येथील एका घरातील चौकीवर श्री शांतादुर्गादेवीच्या धातूच्या मूर्तीची स्थापना केली. ही मूर्ती सध्या वेरे येथील देवळात ठेवण्यात आली आहे. गोव्याला धार्मिक स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मांद्रे येथील मूळ मूर्ती परत वेरे येथे आणून कै. केशव भगवंत पै बुडबुडे यांच्या घरी आणून ठेवली. त्यानंतर शालिवाहन शके १८३४ वैशाख कृष्ण पक्ष द्वितीयेला श्री शांतादुर्गादेवीची मूर्ती नव्याने बांधलेल्या मंदिरामध्ये ठेवण्यात आली.

श्रींचा वार्षिक कालोत्सव

मार्गशीर्ष कृष्ण पक्ष पंचमीच्या रात्री काणूक, पालखी, काला पावणी असेल. मार्गशीर्ष कृष्ण पक्ष षष्ठीच्या दुपारी गौळणकाला, पालखी असणार आहे. सप्तमीला श्रींचे पालखीतून देवळात आगमन झाल्यानंतर आवळी भोजन, होम आणि रात्री रेवळेतून काणूक पालखी, असे धार्मिक कार्यक्रम आहेत.’

संकलक : श्री शांतादुर्गा नेर्लेकरीण संस्थान समिती, वेरे.

जत्रोत्सवाच्या कालावधीत कोरोनाविषयीचे नियम पाळण्याचे आवाहन

यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर साध्या पद्धतीने कोरोनाविषयीचे नियम पाळून साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे जत्रोत्सवाच्या दिवशी भाविकांनी गर्दी न करता कोरोनाविषयीचे नियम पाळून दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.