छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने औरंगाबादचे नामकरण करायला माझे समर्थन आहे ! – खासदार संभाजीराजे छत्रपती  

खासदार संभाजीराजे छत्रपती

नाशिक – छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने औरंगाबादचे नामकरण होत असेल, तर त्याचे स्वागत करायला पाहिजे. औरंगाबादचे नाव पालटण्यासाठी माझे समर्थन आहे, असे प्रतिपादन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ३ जानेवारी या दिवशी येथील शासकीय विश्रामधाम येथे पत्रकारांशी बोलतांना केले. मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्षपदावरून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची हकालपट्टी करून मार्ग निघणार नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

खासदार संभाजीराजे छत्रपती पुढे म्हणाले की, मराठा आरक्षण प्रश्‍नावर पंतप्रधान मोदी यांच्या भेटीची वाट पहात आहे; मात्र मला त्यांच्याकडून अजून वेळ मिळालेली नाही. ई.डब्ल्यू.एस्. आरक्षण घेतल्याने समाजाला धोका होणार नाही, हे सरकारने सांगावे. ई.डब्ल्यू.एस्. आरक्षण घेतल्याने एस्.ई.बी.एस्.ला धोका निर्माण होईल. ई.डब्लू.एस्. आरक्षण सर्व खुल्या वर्गासाठी आहे. ते केवळ मराठा समाजासाठी नाही. न्यायालयावर आमचा विश्‍वास असून चांगला निर्णय अपेक्षित आहे. ओबीसी समाजात भीती निर्माण झाली आहे हे खरे आहे; मात्र ओबीसीला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्या, या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला.

गडकिल्ल्यांचे संवर्धन करा !

आधी किल्ल्यांचे जतन होणे आवश्यक असून शिवस्मारक झाले, तर आनंदच आहे. सर्वाधिक गडकिल्ले नाशिक जिल्ह्यात असून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली. शिवस्मारकची जागा का पालटली ?, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.