अभिनेते रजनीकांत यांच्याकडून राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय रहित केल्याची घोषणा

प्रकृतीच्या कारणामुळे निर्णय

चेन्नई (तमिळनाडू) – अभिनेते रजनीकांत यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजकीय पक्ष स्थापन करण्याचा विचार मागे घेतला आहे. रजनीकांत यांनी ३ पानांचे पत्र ट्वीट करत ही घोषणा केली आहे. पक्ष स्थापन करत नसल्याविषयी त्यांनी जनतेची क्षमाही मागितली आहे.

१. ‘गेल्या काही दिवसांत माझ्या प्रकृतीसंबंधी ज्या काही घडामोडी झाल्या त्या मी देवाची चेतावणी समजतो आणि त्यामुळे वर्ष २०२१ मध्ये होणारी तमिळनाडू विधानसभा निवडणूक लढण्याचा विचार मी रहित करत आहे’, असे त्यांनी म्हटले आहे.

२. काही दिवसांपूर्वी रजनीकांत यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना भाग्यनगरमधील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांना रक्तदाब आणि थकव्याचा त्रास जाणवत होता. डॉक्टरांनी त्यांना एक आठवडा विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

३. रजनीकांत यांनी डिसेंबर २०१७ मध्ये तमिळनाडूत राजकीय पक्ष स्थापन करत असल्याची घोषणा केली होती; मात्र लोकसभा निवडणुकीत रजनीकांत यांनी सहभाग घेतला नव्हता; पण आता होणारी विधानसभा निवडणूक ते लढवणार असल्याची चर्चा होती.