पणजी, २६ डिसेंबर (वार्ता.) – आत्मनिर्भर भारतासमवेत स्वयंपूर्ण गोवा सिद्ध करणे हे शेतकर्यांच्या हाती आहे. भाजपचे केंद्रातील आणि राज्यातील शासन शेतकर्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. कृषी व्यवस्थेतील दलाली भाजपने बंद केली आहे. काँग्रेस पक्ष दलालांची पाठराखण करत आहे. शेतकर्यांच्या प्रयत्नांमुळे अन्नधान्यात गोवा स्वावलंबी बनेल, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय स्तरावर झालेल्या कार्यक्रमात गोव्यातून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस अनेक नेते ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून जोडले होते. पेडणे येथील पेडणे तालुका सहकारी सोसायटी येथे हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. या वेळी उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर, आमदार दयानंद सोपटे आदींची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘गोवा राज्य कृषी उत्पादन, दुग्धोत्पादन, कुक्कुटपालन यांमध्येही स्वयंपूर्ण होणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेखाली शेतकर्यांना पुढचा हप्ता २५ डिसेंबरला देण्यात आला आहे. शेतीकडे लक्ष देणारे शासन आता सत्तेवर आले आहे.’’ अशा स्वरूपाचा कार्यक्रम राज्यात पीर्ण, धारबांदोडा-कुळे, सांगे आदी अनेक ठिकाणी पार पडला. या कार्यक्रमांमध्ये मंत्री आणि स्थानिक आमदार यांनी सहभाग घेतला.