साप्ताहिक शास्त्रार्थ
‘१५.१२.२०२० या दिवसापासून मार्गशीर्ष मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
१. हिंदु धर्मानुसार ‘शार्वरी’ नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४२, उत्तरायण, हेमंतऋतू, मार्गशीर्ष मास चालू आहे.
(संदर्भ : दाते पंचांग)
टीप १ – ज्योतिषशास्त्रानुसार सूर्योदयानंतर वार पालटतो.
टीप २ – प्रदोष, घबाड मुहूर्त, भद्रा (विष्टी करण), यमघंट योग आणि संकष्ट चतुर्थी यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे. टीप ३ – वरील सारणीतील शुभ / अशुभ दिवस पाहून ‘दिवस अशुभ आहे’, हे कळल्यावर ‘प्रवास किंवा इतर सेवा केल्यास त्याचे अशुभ परिणाम भोगावे लागतील’, अशी शंका साधकांच्या मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा साधकांनी संतांची पुढील वचने लक्षात ठेवावीत. १. हरिचिया दासा हरि दाही दिशा । अर्थ : भक्ताला सर्वत्र देवाचेच दर्शन होते. भक्ताचा जसा भाव असतो, त्या स्वरूपात त्याला देव दिसतो. २. तुका म्हणे हरिच्या दासा । शुभ काळ दाही दिशा ॥ – संत तुकाराम अर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, ‘भक्तासाठी सर्व दिशा आणि वेळ ही शुभच असते.’ |
२. शास्त्रार्थ
२ अ. प्रदोष व्रत : त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत करतात. रविवारी येणार्या प्रदोष तिथीला ‘रविप्रदोष’ किंवा ‘भानुप्रदोष’ म्हणतात. भानुप्रदोष व्रत केल्याने उत्तम आरोग्य आणि दीर्घायु प्राप्त होते. या दिवशी सायंकाळी शिवपूजन करावे.
२ आ. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. २७.१२.२०२० या दिवशी दुपारी १.१९ पासून २८.१२.२०२० या दिवशी पहाटे ६.२१ पर्यंत आणि २.१.२०२१ या दिवशी रात्री ८.१७ पासून ३.१.२०२१ या दिवशी सकाळी ८.२३ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.
२ इ. अमृत योग : अमृत योगावर कोणतेही शुभ कार्य केल्यावर यश प्राप्त होते. २८.१२.२०२० या दिवशी दुपारी ३.३९ पासून मंगळवारी सूर्योदयापर्यंत अमृत योग आहे.
२ ई. श्री दत्तात्रेय जयंती : मार्गशीर्ष पौर्णिमेला अत्रिऋषींच्या आश्रमात ब्रह्मा, विष्णु आणि महेश या देवतांचा एकत्रित असा श्री दत्तात्रेयांचा अवतार झाला; म्हणून या पौर्णिमेला श्री दत्तजयंती साजरी केली जाते. प्रदोषकाळी (सूर्यास्तानंतरच्या ३ मुहूर्तांच्या (२ घंटे २४ मिनिटे) कालावधीस प्रदोषकाल म्हणतात.) असलेल्या पौर्णिमेच्या दिवशी श्री दत्तजयंती असते. या निमित्ताने श्री गुरुचरित्राचे पाठ / सप्ताह करून श्री दत्तात्रेयांची उपासना केली जाते. गाणगापूर क्षेत्री श्री दत्तजयंती उत्सव साजरा केला जातो.
२ उ. यमघंट योग : वार आणि नक्षत्र यांच्या संयोगाने ‘यमघंट योग’ होतो. २९.१२.२०२० या दिवशी सायंकाळी ५.३२ नंतर आर्द्रा नक्षत्र आणि मंगळवार एकत्र आल्याने ‘यमघंट योग’ होतो. हा अनिष्ट योग आहे. या योगावर कधीही प्रवास करू नये.
२ ऊ. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळालाच ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. २९.१२.२०२० या दिवशी सकाळी ७.५५ पासून रात्री ८.३० पर्यंत विष्टी करण आहे, तसेच १.१.२०२१ या दिवशी रात्री ९.२५ पासून २.१.२०२१ या दिवशी सकाळी ९.१० पर्यंत विष्टी करण आहे.
२ ए. गुरुपुष्यामृत योग : गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यास ‘गुरुपुष्यामृत योग’ होतो. ३१.१२.२०२० या दिवशी सायंकाळी ७.४९ पासून दुसर्या दिवशी सूर्योदयापर्यंत गुरुपुष्यामृत योग आहे. या दिवशी ‘सुवर्ण खरेदी करणे आणि शुभकार्ये करणे’, असा प्रघात आहे. साधकांनी ‘गुरुपुष्यामृत योगा’वर सुवर्ण खरेदी करण्यापेक्षा अधिकाधिक साधना करणे आवश्यक आहे.
– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (१९.१२.२०२०)