प्रत्येक साधकाला प्रेमाने बांधून ठेवणारे आणि त्यांच्यावर निरपेक्ष प्रीतीचा वर्षाव करणारे एकमेवाद्वितीय सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉ. आठवले !

काही वर्षांपूर्वी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांवरील अत्युच्च प्रेमाचे एक उदाहरण म्हणून एक वाक्य सांगितले होते की, जसे संत तुकाराम महाराज यांना न्यायला विष्णुलोकातून पुष्पक विमान आले होते, तसे मला न्यायला आले, तर मी ‘सर्व साधक त्यात बसले आहेत ना !’, याची निश्चिती करीन आणि नंतरच मी त्यात बसेन. या वाक्याचा गर्भितार्थ आणि वास्तवात साधक अनुभवत असलेले गुरुदेवांचे प्रेम, याची काही उदाहरणे गुरुचरणी समर्पित करत आहे. ‘शिष्य कसाही असला, तरी त्याला बांधून ठेवून त्याच्या ईश्वरप्राप्तीसाठी गुरु किती झटतात ?’, हे सनातन संस्थेच्या प्राणप्रिय गुरुदेवांच्या प्रीतीच्या काही प्रसंगांतून लक्षात येते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

१. शिष्य जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी काही मास किंवा वर्षच नव्हे, तर कित्येक जन्म त्याच्यावर गुरूंचे लक्ष असणे 

‘गुरूंची प्रीती ही जगातील अन्य व्यक्तींकडून मिळणार्‍या प्रेमापेक्षा पुष्कळ भिन्न असते. त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही; कारण त्यांची प्रीती निरपेक्ष असते. ‘शिष्याच्या ऐहिक आणि परमार्थिक उन्नतीचा विचारच नव्हे, तर शिष्य या जन्म-मृत्यूच्या बंधनातून कसा मुक्त होईल ?’, यासाठी काही मास किंवा वर्ष नव्हे, तर कित्येक जन्म त्याच्यावर गुरूंचे लक्ष असते. गुरूंच्या प्रीतीचे विश्लेषण करता येत नाही.

२. साधनेतील घसरण थांबवणे आणि योग्य दिशादर्शन यांसाठी चुकांच्या निर्मूलनासाठीचा राजमार्ग, म्हणजे साधकांना गुरुकृपायोग शिकवणे 

श्री. प्रशांत हरिहर

मनुष्याला ईश्वरप्राप्तीसाठी मार्ग दाखवण्यासाठी सनातन संस्थेची स्थापना ही एक अनमोल देणगीच आहे. जसजसे सनातन संस्थेचे कार्य वाढत गेले आणि साधक जेव्हा साधना करू लागले, तेव्हा साधकांकडून साधनेत होत असलेल्या चुकांची गुरुदेवांनी जाणीव करून दिली. एवढेच नव्हे, तर चुकांच्या निर्मूलनासाठीचा राजमार्ग, म्हणजे गुरुकृपायोगही शिकवला. साधकांनी साधनेत मागे पडू नये आणि आनंदाकडे वाटचाल करावी, हा त्यामागील उद्देश होता.

३. प्रत्येक साधकाला स्वतःचे घर हे आश्रमाप्रमाणे असल्याचा भाव ठेवण्यास सांगणे 

गुरुदेवांनी साधकांच्या मनात आरंभीपासूनच बिंबवले की, ‘सनातनच्या प्रत्येक साधकाचे घर हा आश्रमच आहे. तेथे रहाणार्‍यांनीही एकमेकांशी साधक या नात्याने रहावे’, ही किती मोठी शिकवण आहे. याद्वारे साधकांना स्वतःचे घरच साधनेसाठी पूरक मिळाले. नंतर ते घर हे सनातनच्या अन्य साधकांसाठीही आश्रय देणारे ठरले.

४. प्रत्येक कठीण परिस्थितीला जुळवून घेणारी साधना शिकवून संसारात न अडकता परमार्थाचा मार्ग शिकवणे 

संस्थेच्या स्थापनेच्या आरंभी साधक प्रसारानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी जात असत. तेव्हा त्या साधकांना अन्यत्र थांबणे, जेवण इत्यादीच्या सोयी-सुविधा आता सारख्या सुलभ नव्हत्या. कित्येक साधक रेल्वेस्थानकात झोपून आणि तेथील पाणी पिऊन पुढचा प्रवास करत असत. केवळ गुरुदेवांच्या प्रीतीमुळे साधकांनी हे सर्व केले. आता अनेक ठिकाणी साधकांची निवासस्थाने असल्याने साधक कुठेही राहू शकतात. गुरुदेवांनी साधकांची भक्ती वाढवली. तसेच घर आदींमध्ये त्यांना न अडकवता त्यातून पार नेले. ‘हे विश्वची माझे घर’, ही शिकवण आपोआप साधकांच्या अंगी रुजली.

५. आश्रमात सर्वच बाबतीत विविध जीवनपद्धत असणारे साधक एकत्र आल्याने त्यांना स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व न रहाता ते गुरूंच्या तत्त्वाशी आपोआप एकरूप होणे 

विविध भाषा, विविध राज्ये, विविध उपासनापद्धती, तसेच विविध आहारपद्धतीचे साधक जेव्हा आश्रमात आले, तेव्हा ते एकमेकांशी एकरूप झाले. साधकांनी आश्रमजीवन अंगीकारल्यामुळे त्यांना स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व न रहाता ते गुरूंच्या तत्त्वाशी आपोआप एकरूप झाले. एक प्रकारे गुरुदेवांनी या माध्यमातून साधकांवर कृपाच केली. ‘स्वतःला विसरणे’, हा जो टप्पा आहे, तो साहजिकच साधकांच्या मनावर बिंबवला गेला आहे. आश्रमात जी कार्यपद्धत सांगितली, ती परेच्छा समजून केल्याने ईश्वरेच्छा या टप्याला जाण्याचा मार्गच दाखवला. आज बहुतेक समाजात सून-सासू, भावंडे असे जवळचे नातेच जुळणे कठीण असतांना गुरुदेवांनी आश्रमरूपी वास्तू देऊन विविध प्रकृतीच्या साधकांना जुळवून घेण्यास शिकवले.

६. वारंवार चुका होऊनही साधकाला त्या चुका सुधारण्यासाठी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यास सांगून त्याला साधनेत पुढे जाण्यासाठी साहाय्य करणे 

एखाद्या कार्यालयामध्ये एका कर्मचार्‍याकडून वारंवार चुका होत असल्यास त्याला काही वेळा ‘नोटीस’ देऊन शेवटी काढून टाकण्यात येते. तसेच साधना करत असतांना साधकांकडून वारंवार चुका झाल्यावर साधनेत पुष्कळ हानी होते. ते टाळण्यासाठी त्याला समजवण्यासाठी त्याच्या समवेत चर्चा करण्यात येते, तरी सुधारणा न झाल्यास त्याला स्वतःला पालटण्यासाठी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यास सांगितले जाते. ज्याद्वारे तो अंतर्मुख होऊन त्याला साधनेत पुढे जाण्यासाठी साहाय्य होते. अशा प्रकारे ‘कुणालाही वार्‍यावर न सोडता जोडून ठेवणे’, हीसुद्धा गुरुदेवांची प्रीतीच आहे.

यातून ‘गुरु आपल्या साधक शिष्याला कसे बांधून ठेवतात ? त्याला पुढचे पुढचे कसे शिकवतात ?’, हे दिसून येते, म्हणजे गुरुदेवांचे ‘सर्व साधक पुष्पक विमानरूपी साधनेच्या होडीत बसले आहेत ना ! कुणी राहिले नाही ना !’, असे त्यांचे सतत लक्ष असते. अशा प्रकारे प्रेम देणार्‍या आणि यासाठी कठीण परिश्रम घेणार्‍या गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. प्रशांत हरिहर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(२२.६.२०२६)