पाकिस्तानी सैन्याच्या बलुची नागरिकांवरील अत्याचारांविरोधात आवाज उठवणार्‍या करिमा बलुच यांचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू

करिमा बलुच यांचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू

टोरांटो (कॅनडा) – पाकमधील बलुचिस्तान प्रांतामध्ये पाकचे सैन्य आणि तेथील प्रशासन यांच्याकडून स्थानिक बलुची नागरिकांवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवणार्‍या तेथील सामाजिक कार्यकर्त्या करिमा बलुच यांचा येथे संशास्पदरित्या मृत्यू झाला. ‘बलुचिस्तान पोस्ट’ दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार ‘करिमा बलुच यांचा मृतदेह कॅनडामधील टोरांटो येथे सापडला आहे. करिमा बलुच यांच्या मृत्यूच्या संदर्भात शंका उपस्थित केली जात आहे.’ २० डिसेंबरला करिमा बलुच बेपत्ता झाल्या होत्या. दुपारी ३ च्या सुमारास त्या शेवटच्या दिसल्या होत्या. टोरांटो पोलिसांनी बलुच यांचा शोध घेण्यासाठी स्थानिकांचे साहाय्य घेत ‘करिमा यांच्यासंदर्भात काही माहिती असल्यास कळवावी’, असे आवाहन केले होते; मात्र आता बलुच यांचा मृतदेह सापडल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. बलुचिस्तानमधील स्थानिकांच्या हक्कांसाठी लढणार्‍या आणि या लढ्यात सक्रीय सहभाग असणार्‍या व्यक्तीचा अशा प्रकारे संशयास्पदरित्या मृत्यू होण्याचे हे काही पहिलेच प्रकरण नाही. यापूर्वीही बलुचिस्तानमधील पत्रकार साजिद हुसैन यांचा अशाच प्रकारे स्विडनमध्ये मृत्यू झाला होता.

पाकिस्तानमध्ये सैन्याकडून होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवणार्‍यांना सरकारी यंत्रणांकडून त्रास दिला जातो. अनेकदा अशा सामाजिक कार्यकर्त्यांच्या जिवाला धोका असल्याने ते इतर देशांमध्ये शरणार्थी म्हणून रहातात. करिमा बलुच यांनी कॅनडामध्ये आश्रय घेतला होता. वर्ष २०१६ मध्ये बीबीसीच्या १०० सर्वाधिक प्रभावशाली महिलांच्या सूचीमध्ये करिमा बलुच यांचा समावेश होता. त्या बलुचिस्तानमध्ये अत्यंत लोकप्रिय होत्या. ‘महिलांसाठी लढा देणार्‍या समाजिक कार्यकर्त्या’ म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. स्वित्झर्लंडमधील संयुक्त राष्ट्रांच्या चर्चेच्या वेळी करिमा बलुच यांनी बलुचिस्तान हा विषय उपस्थित केला होता. मे २०१९ या दिवशी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ‘पाकिस्तान सरकार बलुचिस्तानमधील नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करत असले, तरी तेथील लोकांना फारशी किंमत देत नाही’, असे म्हटले होते.

पंतप्रधान मोदी यांना मानत होत्या भाऊ !

करिमा बलुच यांनी एकदा एका मुलाखतीमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाऊ मानत असल्याचे म्हटले होते. इतकेच नव्हे, तर रक्षाबंधनाच्या दिवशी बलुच यांनी ट्विटरवर राखी ‘शेअर’ करत मोदी यांच्याकडे ‘आंतरराष्ट्रीय परिषदेत बलुची लोकांच्या मानवाधिकाराच्या उल्लंघनाच्या विरोधात आवाज उठवावा’, अशी मागणी केली होती, तसेच ‘बलुचिस्तानमधील सर्वच महिलांना मोदींकडून खूप अपेक्षा आहेत’, असे त्यांनी म्हटले होते.