लंडन (इंग्लंड) – बलोच नॅशनल मूव्हमेंटच्या ब्रिटनमधील शाखेने आणि तिच्याशी संबंधित संघटनांनी पाकमध्ये बलुच लोकांवरील अत्याचारांविरुद्ध आवाज उठवण्याची भारत सरकारकडे मागणी केली आहे. या संघटनांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात साहाय्य करण्याचेही आवाहन केले आहे. येथे ‘बलुच हुतात्मा दिवसा’च्या दिवशी आयोजित कार्यक्रमात हे आवाहन करण्यात आले. बलोच नॅशनल मूव्हमेंट, वर्ल्ड सिंधी काँग्रेस आणि बलुच स्टूडंट्स ऑर्गेनायजेशन आझाद आदी संघटना यात सहभागी झाल्या होत्या.
१. या संघटनांनी या वेळी ब्रिटन सरकारवर टीका केली. ब्रिटन सरकार बलुचिस्तानच्या मानवाधिकारांच्या होणार्या उल्लंघनावर मौन बाळगून आहे, असा आरोप त्यांनी केला.
२. बलोच नॅशनल मूव्हमेंटचे प्रवक्ता हम्माल हैदर यांनी म्हटले की, पाकिस्तानच्या सुरक्षादलांनी गेल्या २० वर्षांत २० सहस्र बलुची लोकांचे अपहरण केले आणि त्यातील अनेकांची हत्या केली. आमचे भारताला आवाहन आहे की, त्यांनी पाकच्या या अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. भारताने जसे बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले, तसेच बलुचिस्तानसाठी पुढे येऊन आम्हाला समर्थन दिले पाहिजे.