संपूर्ण विश्वाला ताप देणार्या असुरांचा नाश केल्यानंतर दैत्यांच्या नाशार्थ मारक रूप धारण केलेल्या श्री शांतादुर्गादेवीने गोमंतकात येऊन शांत, तारक रूप धारण केले. तेव्हापासून तिला श्री शांतादुर्गा असे संबोधण्यात येऊ लागले. गोमंतकात ठिकठिकाणी आढळणारी शांत, तारक रूपाच्या श्री शांतादुर्गादेवीची देवालये उर्वरित हिंदुस्थानात कुठेही आढळत नाहीत. डिचोली ग्रामास आपल्या कृपाछत्राखाली घेतलेल्या श्री शांतादुर्गादेवीचा वार्षिक ‘नवा सोमवार’ उत्सव २१ डिसेंबरला साजरा होत आहे.
संकलक – श्री. प्रशांत चणेकर, डिचोली, गोवा.
वैशिष्ट्यपूर्ण पालखी मिरवणूक
गोव्यातील बहुतेक सर्व देवस्थानांत उत्सवाच्या वेळी आणि अन्य वेळी संबंधित देवतेची पालखी मिरवणूक देवस्थानाच्या प्राकारातच काढण्यात येते. डिचोलीतील श्री शांतादुर्गादेवीची पालखी मात्र प्रत्येक सोमवारी देवळातून निघून गावात फेरफटका मारून पुन्हा देवळात परतते. प्रत्येक सोमवारी मिरवणुकीच्या वेळी घराघरांतून नारळ, नैवेद्य, खण, दीप, दान आदी देवीला अर्पण करण्यात येते.
नवा सोमवार – मन प्रफुल्लीत करणारा उत्सव
पावसाळा चालू होण्याच्या काळात म्हणजे साधारणत: ज्येष्ठ मासाच्या दुसर्या आठवड्यापासून श्री शांतादुर्गादेवीची प्रत्येक सोमवारी निघणारी पालखी मिरवणूक बंद ठेवण्यात येते. पावसाळा संपल्यानंतर मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या किंवा दुसर्या सोमवारी पालखी मिरवणूक पूर्ववत् चालू होते. हाच दिवस ‘नवा सोमवार’ म्हणून साजरा केला जातो. पावसाळा चालू होण्यापूर्वी शेवटची पालखी झाल्यावर, ‘यापुढेे सहा महिने देवीची पालखी आपल्या दारात येणार नाही’, या विचाराने दुःखी झालेली गावातील लोकांची मने ‘नवा सोमवार’ कधी उजाडतो आणि आपण देवीचे स्वागत कधी करतो, या एकाच विचारात असतात. प्रत्येक घराला रंगरंगोटी केली जाते. विद्युत रोषणाई, पताका, रांगोळ्या घालून पालखीचा मार्ग सुशोभित केला जातो. डिचोलीवासीय त्यांचे नातेवाइक, मित्रमंडळी यांना खास निमंत्रित करतात. प्रत्येकाच्या दारात पालखी पोचताच सुवासिनींच्या हस्ते खणा-नारळांनी देवीची ओटी भरण्यात येते. या वेळी ब्रह्मवृंदांच्या वतीने मंगलाष्टके म्हटली जातात.
भारतीय संगीताची मैफल : उत्सवाचे खास आकर्षण
यंदा सकाळी श्री शांतादुर्गादेवीला महाभिषेक, लघुरुद्र, आरती आणि तीर्थप्रसाद होईल. त्यानंतर सर्व भाविकांना देवीची भक्तीरूपाने सेवा करण्याची संधी रात्री उशिरापर्यंत दिली जाईल, तसेच भक्तजनांच्या उपस्थितीत देवी श्री शांतादुर्गेला गार्हाणे घालून देवीच्या जयघोषात रात्री ठीक ९ वाजता पालखी मिरवणुकीला प्रारंभ होईल. रात्री १० वाजता देवी श्री शांतादुर्गेच्या प्रांगणात ‘नाट्यभक्ती भावरंग’ हा गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सुप्रसिद्ध गायक श्री. श्रीरंग भावे (पुणे), समवेत गायिका सौ. रेवा नातू (पुणे) यांच्या गायनाचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उत्तररात्री १.३० वाजता देव श्री रवळनाथ मंदिराच्या प्रांगणात सुगम संगीताचा ‘हे चांदणे स्वरांचे’ हा कार्यक्रम होईल. यातील गायक श्री. नितेश सावंत, गायिका सौ. समीक्षा भोबे काकोडकर असतील. पालखीने मंदिरात प्रवेश केल्यानंतर आरती, तीर्थप्रसाद आणि गार्हाणे होऊन उत्सवाची सांगता होईल.
त्याचप्रमाणे डिचोली कोमुनिदाद सभामंडपात राज्यस्तरीय खुल्या गटात रांगोळी स्पर्धा आयोजित केली आहे. ३० डिसेंबरला श्री देवी शांतादुर्गेचा पारंपरिक कालोत्सव होईल.
श्री शांतादुर्गादेवी अत्यंत करुणामय, हाकेला धावून येणारी आणि जागृत असल्याची ख्याती आहे. देवीच्या कृपेची अनेक भाविकांनी अनुभूतीही घेतली आहे.