साप्ताहिक शास्त्रार्थ
‘१५.१२.२०२० या दिवसापासून मार्गशीर्ष मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
१. हिंदु धर्मानुसार ‘शार्वरी’ नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४२, दक्षिणायन आणि २१.१२.२०२० पासून उत्तरायण, हेमंतऋतू, मार्गशीर्ष मास आणि शुक्ल पक्ष चालू आहे.
(संदर्भ : दाते पंचांग)
२. शास्त्रार्थ
२ अ. चंपाषष्ठी, स्कंद षष्ठी, मार्तंड भैरवोत्थापन : मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीला ‘चंपाषष्ठी’, ‘स्कंद षष्ठी’ अशी नावे आहेत. सूर्योदयानंतर ६ घटींपेक्षा जास्त (२ घंटे २४ मिनिटे) आणि अन्य काही योगांनी युक्त षष्ठी तिथी असते. मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेपासून चालू झालेल्या मार्तंड भैरव उत्सवाची समाप्ती या षष्ठी तिथीच्या दिवशी होते. भगवान शंकराने मार्तंड भैरव अवतार घेऊन मणि आणि मल्ल या राक्षसांना मारले अन् जनतेला संकटातून मुक्त केले. या आनंदप्रीत्यर्थ हा उत्सव साजरा केला जातो.
२ आ. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. १९.१२.२०२० या दिवशी सायंकाळी ७.४० पासून २०.१२.२०२० दुपारी २.५३ पर्यंत आणि २५.१२.२०२० या दिवशी उत्तररात्री १.५५ पासून २६.१२.२०२० सकाळी १०.३५ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.
२ इ. उत्तरायणारंभ : ज्योतिषशास्त्रानुसार एका वर्षात दक्षिणायन आणि उत्तरायण अशी दोन आयन असतात. २१ डिसेंबरपासून २१ जूनपर्यंत उत्तरायण काल असतो. या काळात सूर्य उत्तरेकडे झुकण्याचा काळ चालू होतो. उत्तरायणाला देवांचा दिवस म्हणतात. उत्तरायण जप, तप आणि साधना यांसाठी अनुकूल असते. उत्तरायण काळात शुभ कार्ये करतात.
२ ई. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते. त्या काळालाच ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यात विलंब होण्याचा संभव असतो. २१.१२.२०२० या दिवशी सायंकाळी ४.१६ पासून २२.१२.२०२० या दिवशी पहाटे ५.११ पर्यंत आणि २५.१२.२०२० या दिवशी दुपारी १२.३७ पासून उत्तररात्री १.५५ पर्यंत विष्टी करण आहे.
२ उ. कल्पादि : मार्गशीर्ष शुक्ल पक्ष नवमी या तिथीला कल्पादि योग होतो. या दिवशी केलेल्या श्राद्धाचे विशेष फल सांगितले आहे.
२ ऊ. मोक्षदा एकादशी : मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील एकादशीला ‘मोक्षदा एकादशी’ म्हणतात. या दिवशी विष्णूच्या दामोदर रूपाची पूजा करतात. या एकादशी व्रताने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि मोक्ष मिळतो.
२ ए. गीताजयंती : ‘मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील एकादशीला भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेशामृतरूपी गीता सांगितली’, असे मानले जाते; म्हणून या दिवशी गीताजयंती साजरी केली जाते. या निमित्ताने गीतेवर आधारित प्रवचने, गीतापठण असे कार्यक्रम केले जातात.
– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (१३.१२.२०२०)
टीप १ – ज्योतिषशास्त्रानुसार सूर्योदयानंतर वार पालटतो.
टीप २ – क्षयदिन, कालाष्टमी, घबाड मुहूर्त, भद्रा (विष्टी करण) आणि एकादशी तिथी यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे. टीप ३ – वरील सारणीतील शुभ / अशुभ दिवस पाहून ‘दिवस अशुभ आहे’, हे कळल्यावर ‘प्रवास किंवा इतर सेवा केल्यास त्याचे अशुभ परिणाम भोगावे लागतील’, अशी शंका साधकांच्या मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा साधकांनी संतांची पुढील वचने लक्षात ठेवावीत. १. हरिचिया दासा हरि दाही दिशा । अर्थ : भक्ताला सर्वत्र देवाचेच दर्शन होते. भक्ताचा जसा भाव असतो, त्या स्वरूपात त्याला देव दिसतो. २. तुका म्हणे हरिच्या दासा । अर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, ‘भक्तासाठी सर्व दिशा आणि वेळ ही शुभच असते.’ ज्या व्यक्तीच्या मनात सतत ईश्वरप्राप्तीचा ध्यास आहे, अशा भक्ताची काळजी ईश्वर घेतो.’ |