उसगाव येथील गोवा मांस प्रकल्प चालू करण्याच्या मागणीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव मुख्यमंत्र्यांना भेटणार

कर्नाटकच्या गोहत्या बंदी कायद्यामुळे गोव्यात गोमांसाचा तुटवडा भासत असल्याचे प्रकरण

राष्ट्रवादी काँग्रेसचे गोव्याचे आमदार चर्चिल आलेमाव

मडगाव, १७ डिसेंबर (वार्ता.) – कर्नाटक शासनाने गोहत्या बंदी विधेयक संमत केल्याने गोव्यात गोमांसाचा तुटवडा भासत आहे. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे गोव्याचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी गोवा शासनाचा उसगाव, फोंडा येथील गोवा मांस प्रकल्प त्वरित चालू करून राज्यातील गोमांसाचा तुटवडा दूर करण्याची मागणी केली आहे. या विषयावरून १८ डिसेंबर या दिवशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेणार असल्याचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी म्हटले आहे. या पत्रकार परिषदेला गोवा अल्पसंख्यांक संघटनेचे अध्यक्ष शेख इफ्तीयार यांचीही उपस्थिती होती.

नाताळ आणि ख्रिस्त्यांचे नववर्ष या निमित्ताने राज्यात गोमांसाचा तुटवडा भासणार असल्याची चिंता गोमांस विक्रेते आणि गोमांस भक्षक यांना वाटत आहे. आमदार चर्चिल आलेमाव पुढे म्हणाले, ‘‘उसगाव, फोंडा येथील गोवा मांस प्रकल्प गेली ५ वर्षे बंद आहे. या प्रकल्पाची प्रतिदिन २०० प्राण्यांची हत्या करण्याची क्षमता आहे.’’ या वेळी गोवा अल्पसंख्यांक संघटनेचे अध्यक्ष शेख इफ्तीयार म्हणाले, ‘‘राज्यात प्रतिदिन स्थानिक नागरिक आणि पर्यटक यांना मिळून एकूण २५ टन गोमांसाची आवश्यकता भासते.’’

गोवा मांस प्रकल्पाशी निगडित समस्यांवर तोडगा काढण्याचा पशूसंवर्धन खात्याच्या संचालकांना आदेश

पणजी – उसगाव, फोंडा येथील गोवा मांस प्रकल्पाशी संबंधित सर्व समस्यांवर तोडगा काढण्याचा आदेश पशूसंवर्धन खात्याच्या संचालकांना दिल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.