४ मासांपासून पसार
जनताद्रोही पोलीस !
कडेगाव (जिल्हा सांगली), १७ डिसेंबर (वार्ता.) – स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी साहाय्य करीन, असे सांगत बंगल्यावर नेऊन वारंवार बलात्कार केल्याच्या प्रकरणी कडेगाव पोलीस पोलीस ठाण्याचे निलंबित पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस यांच्यावर २८ ऑगस्ट २०२० या दिवशी बलात्काराचा गुन्हा नोंद झाला होता. यानंतर ते ४ मास पसार होते. या कालावधीत जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय अशा दोन्हीकडे त्यांचे अटकपूर्व जामीन आवेदन फेटाळण्यात आले. विपीन हसबनीस १७ डिसेंबर या दिवशी कडेगाव पोलीस ठाण्यात शरण आले. यानंतर त्यांना तात्काळ अटक करण्यात आली.
तासगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे या प्रकरणी अन्वेषण करत आहेत. गुन्हा नोंद झाल्यावर निलंबित पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस पोलिसांना ४ मास गुंगारा देत होते. त्यामुळे त्यांना अटक होऊ शकली नव्हती. (गुन्हा नोंद झाल्यावर पोलीस निरीक्षकच जर पोलिसांना सापडत नसेल, तर ‘पोलीस आणि संबंधित निलंबित पोलीस निरीक्षक यांच्यात काही साटेलोटे आहे का ?’, असा प्रश्न जनतेला पडल्यास नवल ते काय ? अटकपूर्व जामिनासाठी पोलीस निरीक्षक जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय येथे जाऊ शकतो; मात्र पोलिसांना सापडत नाही. यामुळे पोलिसांच्या अन्वेषणाविषयी निश्चितच जनतेच्या मनात संशय उत्पन्न होऊ शकतो. असे पोलीस प्रशासन सामान्य जनतेला न्याय देतील का ? – संपादक)