रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम पाहिल्यावर जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय !

अशा दैवी आश्रमावर सनातनद्वेष्टे मात्र दगडफेक आणि शिवीगाळ करतात !

१. श्री. विश्‍वनाथ कावळे, भवानीनगर, बेळगाव

१ अ. ‘भगवंताच्या सान्निध्यात असल्याचे जाणवून ‘पूर्णवेळ साधना करावी’, असे वाटणे : ‘आश्रमात मला पुष्कळ चांगला अनुभव आला. येथे पुष्कळ चैतन्य जाणवून ‘मी पृथ्वीवर नसून भगवंताच्या सान्निध्यात आहे’, असे वाटले. येथील निर्जीव वस्तूही सजीव वाटतात. येथील साधक विनम्रपणे वागतात. ‘मीही स्वतःत असा पालट करावा आणि पूर्णवेळ साधक होऊन भगवंताची सेवा करावी’, असे मला वाटले. भगवंताच्या इच्छेनेच मी येथे आलो असून ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांंनी मला बोलावले आहे’, असे मला वाटले.

१ आ. ध्यानमंदिरात आलेल्या अनुभूती : मी ध्यानमंदिरात बसलो असतांना मला ‘हनुमंताच्या लहान मूर्तीमधून प्रकाश येत आहे’, असे दिसले आणि प.पू. भक्तराज महाराज यांची काठी अन् हात हलतांना दिसला.’ (८.३.२०२०)

२. सौ. माधवी धनेश नांगरे, सावंतवाडी, सिंधुदुर्ग

२ अ. आश्रमात आल्यावर मन निर्विचार झाले ! : ‘मला रामनाथी आश्रम पहाण्याची पुष्कळ ओढ होती. आश्रम पाहून माझे मन प्रसन्न झाले. ‘मी प्रत्यक्ष चैतन्याच्या भूमीत आले असून माझे मन निर्विचार झाले आहे’, असे मला जाणवले. ‘आश्रमातील साधकांची प्रत्येक कृती ईश्‍वराजवळ नेणारी आहे’, असे मला वाटले.’ (७.३.२०२०)