कार्तिक कृष्ण पक्ष नवमी (९.१२.२०२०) या दिवशी रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे श्री. संदीप शिंदे आणि ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या चि.सौ.कां. स्वाती गायकवाड यांचा शुभविवाह झाला. त्यानिमित्त त्यांच्याविषयी साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
गुरूंवर दृढ श्रद्धा असणारे श्री. संदीप शिंदे !
श्री. विक्रम डोंगरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. सेवाभाव
‘संदीपदादा एकदा म्हणाला होता, ‘‘श्री गुरूंचे कार्य आपण अंगावर घेऊन केले पाहिजे.’’
२. श्री गुरुकार्याप्रतीची तीव्र तळमळ
गुरुकार्याचा प्रसार अधिकाधिक परिणामकारक होण्यासाठी त्याचा महत्त्वाचा हातभार असतो. त्याला अनेक सेवांमधील बारकावे ज्ञात आहेत आणि तो त्या सेवांविषयी सहजपणे मार्गदर्शन करू शकतो.
‘जो शिष्य आपल्या गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचा, म्हणजे अध्यात्माचा पूर्णवेळ आणि १०० टक्के परिणामकारक प्रसार करतो, त्याच्यावर श्री गुरूंची कृपा सर्वाधिक होते’, असे परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘प्रास्ताविक विवेचन’ या ग्रंथात अनेक वर्षांपूर्वी लिहून ठेवले आहे. या ब्रह्मवाक्यानुसार संदीपदादा ‘पूर्णवेळ आणि १०० टक्के परिणामकारक अध्यात्मप्रसार कसा होईल ?’, यासाठी झटत असतो.
३. सतत कार्यरत असूनही तेवढ्याच एकाग्रतेने सेवा करणे
संदीपदादा सतत कार्यरत असतो. एका सेवेनंतर त्वरित दुसरी सेवा करायला तो सिद्ध असतो. एवढे असूनही प्रत्येक सेवेच्या वेळी असलेली त्याची एकाग्रता वाखाणण्यासारखी आहे.
४. अडचणींवर योग्य उपाययोजना सुचवणे
एखाद्या सेवेविषयी कितीही मोठी समस्या असेल, तरी तिच्यातील बारकाव्यांचा आम्हाला अभ्यास करायला लावून तो ती समस्या नेमकेपणाने जाणून घेतो आणि अत्यंत कुशलतेने अन् तेवढ्याच सहजतेने त्यावर त्वरित योग्य उपाययोजना सुचवतो. त्याने अल्प कालावधीत सुचवलेली उपाययोजना सर्वांगांनी उपयुक्त अशीच असते. त्यामुळे अनेक सेवांच्या निर्णयाच्या संदर्भात साधक त्याचे मत प्राधान्याने घेतात. ‘कोणत्याही सेवेच्या संदर्भातील प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे नाही’, असे नसते.
५. इतरांना साहाय्य करणे
साधकांना सेवेत काही साहाय्य हवे असल्यास ते करण्यास तो सदैव सिद्ध असतो. प्रसंगी त्याची सेवा बाजूला ठेवून तो सहसाधकांना साहाय्य करतो. त्यामुळे त्याला स्वतःची सेवा करण्यासाठी अनेक वेळा रात्री पुष्कळ उशीर होतो. असे असूनही त्याचे त्याविषयी कधीच गार्हाणे नसते.
६. अन्य गुण
नेतृत्वगुण, समष्टी भाव, दुसर्यांना समजून घेणे, मनमोकळेपणा, असे अनेक दैवी गुणही त्याच्यामध्ये आहेत. (६.१२.२०२०)
श्री. भूषण कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. प्रेमभाव
‘श्री. संदीपदादा गणेशोत्सवाच्या काळात पुणे येथे घरी जातात. त्या कालावधीत ते बहीण, मावशी, तसेच पुणे येथील अनेक साधकांना भेटतात किंवा किमान त्यांच्याशी भ्रमणभाषद्वारे संपर्क करतात. ते घरच्यांसाठी आणि काही मित्रांसाठीही गोवा येथून जातांना खाऊ घेऊन जातात. पुणे येथून गोवा येथील आश्रमात परत येत असतांना ते कोणा साधकाच्या काही वस्तू आणायच्या असतील, तर आवर्जून आणतात आणि साधकांसाठी खाऊही आणतात. (५.१२.२०२०)
सौ. स्वाती शिंदे यांची साधिकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१. कु. धनश्री टोंगे, सनातन आश्रम, गोवा.
१ अ. व्यष्टी प्रकृतीकडून समष्टी प्रकृतीकडे जाणे
‘स्वाती आश्रमात नवीनच आली, तेव्हा अल्प बोलायची. तिला सर्वांसमोर बोलायला जमायचे नाही. तिची समष्टी प्रकृती नव्हती; मात्र ती ज्या सहसाधकांच्या समवेत असायची, म्हणजे खोलीतील साधक किंवा तिच्या समवेत सेवा करणारे साधक यांच्याशी तिची चांगली मैत्री आणि जवळीक होती.
ती एका संतांची सेवा करायची. तेव्हा त्यांच्याविषयी तिच्या मनात असलेल्या अपार भावामुळे तिथल्या सगळ्या सेवा करतांना तिला पुष्कळ आनंद मिळायचा. ती देवाचे अस्तित्व आणि त्याची प्रीती अंतरातून अनुभवायची. आम्ही जेवायला एकत्र बसल्यावर ती ‘सेवा करतांना तिने काय अनुभवले ?’, ते आम्हाला सांगायची. ते सांगतांना त्यातून आम्हालाही ते अनुभवता येऊन आनंद मिळायचा. त्यातूनच देवाने तिला हळूहळू सगळ्यांमध्ये मिसळायला आणि बोलायला शिकवले. पुढे तिला वेगवेगळ्या समष्टी सेवांच्या माध्यमातून देवाने असे घडवले की, ती आता समष्टीसमोर बोलू शकते. आता ती साधकांना साधनेत मार्गदर्शन करून त्यांना साहाय्य करू शकते. एवढेच नाही, तर तत्त्वनिष्ठतेने त्यांच्या चुकाही सांगू शकते. (४.१२.२०२०)
२. कु. गुलाबी धुरी
२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव
स्वातीताईने मला प्रवासात गुरुदेवांचे छायाचित्र दिले होते. मी आणि ती एकाच खोलीत रहात होतो. आम्ही खोलीत आल्यावर मी गुरुदेवांचे छायाचित्र पटलावर ठेवले. स्वातीताईच्या हे लक्षात आल्यावर तिने ते छायाचित्र पटकन उचलले. ते पटल लगेच हातानेच पुसले. त्यावर तिने एक कापड घातले आणि मग ते छायाचित्र पटलावर ठेवून समवेत आणलेली फुले त्या छायाचित्राला वाहिली. तिची ही कृती बघून माझा भाव जागृत झाला आणि मला माझ्या कृतीची खंत वाटली. तिच्याकडून मला ‘भाव कसा असायला हवा ?’, हे शिकायला मिळाले.’ (४.१२.२०२०
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |