९ डिसेंबरला विदर्भस्तरीय भव्य भजन आंदोलनाचे आवाहन !
अकोला, ८ डिसेंबर (वार्ता.) – १०० भाविकांच्या उपस्थितीत भजन आणि कीर्तन यांसाठी अनुमती देण्यात यावी, या मागणीसाठी स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २ डिसेंबरपासून वारकरी संघटनांचे साखळी उपोषण चालू आहे. विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष ह.भ.प. गणेश महाराज शेटे यांची प्रकृती आमरण उपोषणामुळे चिंताजनक झाली आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ७ डिसेंबर या दिवशी काही वारकर्यांसमवेत बैठक घेऊन स्पष्ट केले की, भजन-कीर्तनावरील बंदी सरकारने अजून कायम ठेवलेली आहे; म्हणून आपल्याला रीतसर अनुमती देता येणार नाही. त्यामुळे वारकर्यांमध्ये रोष निर्माण झाला. वारकर्यांकडून उपोषणस्थळी सरकारला सद्बुद्धी मिळावी, यासाठी संत गजानन महाराज यांच्या मूर्तीसमोर ‘सद्बुद्धी यज्ञ’ करण्यात आला.
वारकरी संप्रदायाची शक्ती सरकारला दाखवण्याच्या उद्देशाने ९ डिसेंबरला दुपारी १२ वाजता स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततेच्या मार्गाने भव्य भजन आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विदर्भातील दिंडी सोहळे, भजनी मंडळे, धार्मिक संघटना, सामाजिक संघटना, शेतकरी संघटना, महिला बचत गट या सर्वांनी टाळ, मृदुंग, वीणा या वाद्यांसह वारकरी पोषाखामध्ये भजन आंदोलनामध्ये स्वव्ययाने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन विश्व वारकरी सेनेचे ह.भ.प. गणेश महाराज शेटे यांनी पत्रकार परिषदेत केले.