श्रीराममंदिरासाठी मिळणार्‍या अर्पणाचा हिशोब द्या ! – छत्तीसगडचे काँग्रेसचे मंत्री सिंहदेव यांची मागणी

काँग्रेसने मंदिरासाठी १०१ कोटी रुपये अर्पण देण्याची भाजपची मागणी

मंदिरासाठी मिळणार्‍या अर्पणाचा हिशोब मागण्याचा प्रत्येक हिंदूला अधिकार आहे; मात्र आजन्म मंदिराला विरोध करणार्‍या काँग्रेसला मुळात हा अधिकार आहे का ? आज न्यायालयाच्या आदेशाने मंदिर बांधले जात असतांना काँग्रेसने न्यायालयात अप्रत्यक्षरित्या मंदिर होऊ नये, यासाठीच प्रयत्न केले होते, हे हिंदू विसरणार नाहीत !

रायपूर (छत्तीसगड) – श्रीराममंदिरासाठी गोळा करण्यात येणार्‍या धनाचा हिशोब देशाच्या समोर ठेवण्यात आला पाहिजे, अशी मागणी राज्यातील काँग्रेस सरकारमधील आरोग्यमंत्री टी.एस्. सिंहदेव यांनी केली आहे. भाजपने यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले आहे की, अशा प्रकारचा हिशोब मागण्यापूर्वी काँग्रेस सरकारने मंदिरासाठी १०१ कोटी रुपये अर्पण म्हणून दिले पाहिजेत.

 (सौजन्य : ABP NEWS)

१. टी.एस्. सिंहदेव म्हणाले की, हिशोब मागणे चुकीचे नाही. यावर कोणताही वाद होऊ नये. कुणालाही हिशोब देण्यात काय अडचण आहे ? यापूर्वीही हिशोब मागण्यात आला आहे. अर्पणातून मिळालेला पैसा कुठे खर्च होत आहे, हे समजले पाहिजे. देशात ७ लाख गावे आहेत. यांतून आलेला पैसा ट्रस्टला किती मिळाला, हे समजले पाहिजे.

२. काँग्रेसचे प्रवक्ते सुशील आनंद शुक्ला यांनी प्रश्‍न उपस्थित केला की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने स्थापन झालेल्या मंदिर समितीने अर्पणासाठी बँक खाते उघडून त्यात पैसे जमा करण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे रा.स्व. संघ कोणत्या अधिकाराने मंदिरासाठी पैसे गोळा करणार आहे ? संघाला यासाठी अधिकृत अनुमती मिळाली आहे का ?