अंतर्गत प्रकरणांत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू नका ! – भारताची कॅनडाच्या पंतप्रधानांना समज

भारतातील शेतकर्‍यांच्या आंदोलनावर कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांचे भाष्य

कॅनडामध्ये मोठ्या संख्येने शीख धर्मीय रहातात आणि देहली येथे आंदोलन करणारे शेतकरी मोठ्या संख्येने शीख असल्याने ट्रुडो यांनी मतांच्या लांगूलचालनासाठीच या आंदोलनावर भाष्य केल्याचे लक्षात येते ! जसे भारतीय राजकारणी करतात, तोच भाग ट्रुडो यांनीही केला आहे !  

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो

नवी देहली – गेल्या काही दिवसांपासून देहलीच्या सीमेवर शेतकर्‍यांच्या चालू असलेल्या आंदोलनावर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भाष्य केले आहे. यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ‘भारताच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू नका’, अशा शब्दात ट्रुडो यांना समज दिली आहे. तसेच भाजप, शिवसेना यांनीही ट्रुडो यांच्यावर टीका केली आहे.


परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले की, भारतीय शेतकर्‍यांशी संबंधित कॅनडाच्या नेत्यांची वक्तव्ये चुकीच्या माहितीवर आधारलेली आहेत. अशाप्रकारच्या वक्तव्यांना कसल्याही प्रकारचा अर्थ नाही, विशेषतः जेव्हा प्रश्‍न एखाद्या लोकशाही देशातील असतो. मुत्सद्देगिरीच्या पातळीवरील चर्चेला राजकीय हेतूने चुकीच्या पद्धतीने ठेवू नये.’