देहली येथून विमानाने आणि रेल्वेने येणार्या प्रवाशांसाठी गोवा शासन कठोर मार्गदर्शक तत्त्वे कार्यवाहीत आणणार
पणजी, २२ नोव्हेंबर (वार्ता.) – देहली येथे कोरोनाच्या संसर्गात वाढ झाल्याने गोवा राज्य देहली येथून विमानाने येणारे आणि रेल्वेने येणारे प्रवासी यांच्यासाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वे कार्यवाहीत आणणार आहे, तसेच छठ पूजेनंतर उत्तर भारतातून मोठ्या प्रमाणावर मजूर गोव्यात येणार आहेत. या मजुरांसाठी गोवा शासन विशेष मार्गदर्शक तत्त्वे लागू करणार आहे.
कोरोनाग्रस्त राज्यांतून गोव्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची उपस्थिती
देहलीसह उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तरांचल, बिहार, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि गुजरात या राज्यांतून गोव्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक आले आहेत. या राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. या पर्यटकांची गोव्यात कुठेही तपासणी केली जात नाही. राज्यातील किनारी भाग आणि विविध पर्यटनस्थळे सध्या पर्यटकांनी भरून गेली आहेत. यामुळे गोव्यातही कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तरंगत्या कॅसिनोवरील ३० कर्मचारी कोरोनाबाधित
मांडवीतील एका तरंगत्या कॅसिनोवरील ३० कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. दीपावलीच्या सुट्टीत तरंगत्या कॅसिनोंमध्ये पर्यटकांची झुंबड दिसून येते. यामुळे गोव्यात कोरोनाच्या संसर्गात वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.