नवी देहली – पाकिस्तान वर्ष १९९० पासून भारताच्या विरोधात जिहादी आतंकवाद्यांना एकत्र करत आहे. हे काम तो चालूच ठेवणार आहे. थोड्याशा पैशांसाठी सिद्ध होणारे मूर्ख आणि अशिक्षित आतंकवादी पाकला मिळतच रहाणार. यामुळे भारतीय सुरक्षायंत्रणांना आणि देशवासियांना सतर्क रहावे लागणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री आणि माजी सैन्यदलप्रमुख व्ही.के. सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केले.
सिंह पुढे म्हणाले की,
१. पाकमध्ये आतंकवाद्यांची साथ कोण देत आहेत हे आम्हाला ठाऊक आहे. संरक्षण यंत्रणा सातत्याने यावर काम करत आहेत. सैन्य आणि पोलीस दल यांच्यात जसा आता समन्वय आहे तो असाच यापुढेही कायम राहिला, तर कोणत्याही प्रकारे पाकचे प्रयत्न आपण हाणून पाडू. जे आतंकवादी सीमेमध्ये प्रवेश करतील ते पुन्हा जिवंत परत जाऊ शकणार नाहीत, याची मला निश्चिती आहे.
२. जे नेते काश्मीरमध्ये चीनच्या हस्तक्षेपाच्या गोष्टी करतात त्यांच्या मनात निराशा आहे. एकप्रकारे ते स्वतःची सदसद्विवेकबुद्धी गमावून बसले आहेत. आपण काय बोलत आहोत याची त्यांना कल्पनाच नाही आणि जे लोक असे बोलत आहेत ते स्वार्थी आहेत. त्यांना ना देश दिसतो ना देशातील नागरिक. कशाही प्रकारे आपण पुन्हा गादीवर विराजमान होऊ. पुन्हा आपण लुटू आणि आपले घर भरू, असे त्यांना वाटत आहे.