कोरोनानंतर आता ‘चापरे’ विषाणूचा धोका

वॉशिंग्टन (अमेरिका) – जगभरात कोरोनाचे संकट चालू असतांना आता ‘चापरे’ हा नवीन विषाणू समोर आला आहे. या आजाराची लक्षणे डेंग्यू आणि इबोला यांसारखी आहेत. या विषाणूंची बाधा झाल्यास ताप येतो आणि या तापाचा परिणाम थेट मेंदूवर होतो. या विषाणूंमुळे ‘ब्रेन हॅमरेज’चा धोका असल्याचे तज्ञांनी सांगितले. या आजारावर अद्यापतरी ठोस औषध सापडलेले नाही. सध्या उपलब्ध असलेल्या औषधांद्वारे उपचार करण्यात येतात. बोलिव्हियातील ‘चापरे’ भागात हा विषाणू वर्ष २००४ मध्ये आढळला होता. त्यावरून या विषाणूला ‘चापरे’ हे नाव ठेवण्यात आले.

१. जॉर्जटाऊन विद्यापिठातील संशोधक कॉलिन कार्लन यांनी सांगितले की, बाधित व्यक्तीच्या संपर्कात येणार्‍या व्यक्तींनाही या विषाणूची बाधा होण्याची शक्यता आहे.  चापरेची बाधा झाल्यास कोरोना अथवा इतर तापाच्या आजारापेक्षा या आजाराची लक्षणे लवकर आढळून येतात.

२. चापरे विषाणूची बाधा झालेल्या व्यक्तींना ताप येणे, पोटात दुखणे, उलट्या, हिरड्यांमधून रक्त येणे, त्वचेवर व्रण उठणे, डोळे चुरचुरणे आदी लक्षणे आढळून येतात.