पबजीच्या आहारी गेल्याने आंध्रप्रदेशातील १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

प्रतीकात्मक छायाचित्र

भाग्यनगर – पबजी या खेळाच्या आहारी गेल्याने खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष होऊन एका १६ वर्षीय मुलाला जीव गमावावा लागल्याची धक्कादायक घटना आंध्रप्रदेशमध्ये घडली आहे. दळणवळण बंदीच्या काळात गेले ४ मास घरी असल्यामुळे त्याला पबजी या खेळाचे व्यसन लागले. मागील अनेक दिवसांपासून तो केवळ पबजी खेळत होता. खेळण्याच्या नादात तो अनेक दिवस जेवायचाही नाही, असे इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. योग्य प्रमाणात पाणी न पिल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण न्यून झाले आणि त्याला डिहायड्रेशनचा त्रास होऊ लागला; मात्र शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण सतत न्यून होत गेल्याने त्याची प्रकृती आणखीन खालावली आणि उपचारांच्या कालावधीत त्याचा मृत्यू झाला.

यापूर्वीही अशाप्रकारे पबजी खेळाच्या व्यसनामुळे २५ वर्षीय मुलाला प्राण गमवावे लागल्याची घटना पुण्यात घडली होती. खेळता खेळता तरुणाला मेंदूघाताचा (ब्रेन स्ट्रोक) झटका आला. सतत खेळल्याने त्याच्या मेंदूवर गंभीर परिणाम झाल्याचे दिसून आले. पबजी हा खेळ दक्षिण कोरियामधील आस्थापनाने विकसित केला असला, तरी त्यामध्ये चीनमधील टेनसेंट या आस्थापनाचा मोठा वाटा आहे. हा खेळ खेळणार्‍याला व्यसन लागल्यास त्याच्या वागणुकीमध्ये मोठा पालट होत असल्याचे अनेक घटनांमधून वेळोवेळी दिसून आले आहे.

(आजच्या पिढीची किती वेगाने अधोगती होत आहे, हे या घटनांवरून निदर्शनास येते. आपले मूल एखाद्या खेळाच्या व्यसनामध्ये वहावत जात असतांना पालकांचे लक्ष नसते का ? सुसंस्काराच्या अभावी पाल्यांची अशी अधोगती होत आहे, यावरून समाजाला धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे लक्षात येते ! – संपादक)