राज्यातील १२ आमदारांच्या विरोधातील अपात्रता याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

पणजी, २३ जुलै (वार्ता.) – काँग्रेस आणि मगोप यांनी राज्यातील एकूण १२ आमदारांच्या विरोधात प्रविष्ट केलेल्या अपात्रका याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात २४ जुलै या दिवशी सुनावणी होणार आहे. गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांनी १२ आमदारांवरील अपात्रता याचिकेवर सुनावणी घेण्यास विलंब केल्याचा आरोप काँग्रेस आणि मगोप यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट केलेल्या याचिकेत केला आहे.

कोरोना महामारीमुळे सुनावणी घेण्यास विलंब ! – सभापती राजेश पाटणेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिली माहिती

राज्यातील १२ आमदारांच्या विरोधात अपात्रता याचिकेवर सुनावणी होण्याच्या एक दिवस आधी गोवा विधनासभेचे सभापती राजेश पाटणेकर यांनी आरोपाला प्रत्युत्तर देणारे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे. यामध्ये सभापती राजेश पाटणेकर म्हणतात, ‘‘काँग्रेस आणि मगोप यांनी प्रविष्ट केलेल्या अपात्रता याचिकेवर कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर मार्चनंतर एकदाही सुनावणी घेता आली नाही.’’ अशाच स्वरूपाच्या अन्य एका राज्यातील प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करतांना म्हटले होते की, विधानसभेच्या सभापतींनी अपात्रता याचिकेवर समयमर्यादेत निवाडा देणे आवश्यक आहे.’’