कोरोनाच्या काळातही देशाचा विकास थांबला नाही ! – पंतप्रधान

मणिपूर येथे पाणीपुरवठा प्रकल्पाची पायाभरणी

नवी देहली – कोरोनाच्या काळातही देशाचा विकास थांबला नाही आणि थकला नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मणिपूर येथे २३ जुलै या दिवशी केंद्र सरकारच्या ‘प्रत्येक घरी पाणी’, या योजनेच्या अंतर्गत पाणीपुरवठा प्रकल्पाचा पायाभरणी सोहळा पार पडला. त्या पार्श्‍वभूमीवर ते ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून बोलत होते. ‘हा प्रकल्प म्हणजे रक्षाबंधनानिमित्त बहिणींना भेट आहे’, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, ‘‘पूर्वोत्तर भारताच्या पूरग्रस्त राज्यांना केंद्राकडून सतत साहाय्य केले जात आहे. हा पाणीपुरवठा प्रकल्पामुळे भावी पिढ्यांनाही लाभदायी ठरणार आहे. शुद्ध पाण्यामुळे केवळ लोकांची तहानच भागेल, असे नाही, तर लोकांना चांगले आरोग्य आणि रोजगारही मिळेल.

राज्यात अनुमाने २५ लाख लोकांना विनामूल्य धान्य मिळाले आहे. दीड लाखांहून अधिक महिलांना विनामूल्य गॅस सिलिंडर मिळाले आहेत. प्रतिदिन १ लाख पाण्याची जोडणी दिली जात आहे. या प्रकल्पाचा इंफाळलाही लाभ होणार आहे.’’