कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी सामाजिक योगदान द्यावे ! – शेखर सिंह, जिल्हाधिकारी

सातारा, २४ मार्च (वार्ता.) – कोरोना विषाणूचा संसर्ग हे जागतिक संकट असून त्याचा संसर्ग थांबवणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्यकर्तव्य आहे. त्यामुळे प्रत्येक आस्थापन आणि कारखाने यांनी कामगारांना घरी थांबण्याच्या सूचना द्याव्यात. तसेच या काळातील वेतनही त्यांना द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.

जिल्हाधिकारी शेखर सिंह पुढे म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी कामगारांना घरी थांबण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. या काळात आस्थापने आणि कारखाने यांचे मालक कामगारांना विनावेतन सुटीवर पाठवू शकतात. तसेच त्यांना कामावरून अल्प करू शकतात. अशा संकटसमयी सर्वांनीच संघटितपणे तोंड देणे आवश्यक आहे. त्यामुळे कामगार जरी कामावर नसले, तरी त्यांची पगारी सुटी धरून त्यांना किमान वेतन द्यावे. असे न केल्यास सामाजिक संतुलन बिघडून कामगारांवर उपासमारीची वेळ येईल. तेव्हा कामगारांना वेतन देऊन आस्थापनांचे मालक, दुकानदार, कारखानदार आदींनी सामाजिक योगदान द्यावे.