कोरोना साथीमुळे नांदापूर (जिल्हा हिंगोली) गावात नवीन व्यक्तींना प्रवेशबंदी

ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय

हिंगोली – कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर शहरी भागासमवेतच ग्रामीण भागातही खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या जात असून जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील नांदापूर येथील गावकर्‍यांनी नवीन व्यक्तींना गावात प्रवेशबंदी केली आहे. याविषयीचा निर्णय २३ मार्च या दिवशी ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला. अशा प्रकारचा निर्णय घेणारे नांदापूर हे राज्यातील पहिलेच गाव आहे. नांदापूर गावाची लोकसंख्या २ सहस्र ७०० आहे. गावातून बाहेरगावी जाणार्‍या व्यक्तींना ग्रामपंचायतीच्या नोंदवहीत नोंद करूनच बाहेरगावी जायचे आणि परत आल्यानंतर त्याची नोंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे, तसेच गावात प्रवेश करतांना साबणाने हात धुऊनच प्रवेश करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.