सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेत झालेल्या पालटांची सद्गुरूंनी केलेली निरीक्षणे

‘वयोमानानुसार आता मला बाहेर कुठे जाणे शक्य होत नाही. खोलीतच माझे ग्रंथ-लिखाणाचे कार्य चालू आहे. असे असतांना देव मला माझ्या खोलीतच नवनवीन विषय शिकवत आहे. सध्या माझ्या देवघरातील देवतांच्या चित्रांमध्ये सकारात्मक पालट होतांना दिसत आहेत. आजवर ऐकिवात नसलेले असे विषय देव शिकवत आहे. केवळ नवीन विषय शिकायला मिळाला, असे न होता त्याचे संशोधनही करता येत आहे. देव इतके देऊन थांबलेला नाही, तर देव त्यांचे शास्त्रही ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांच्या माध्यमातून सांगत आहे. हे सर्वकाही शिकवतांना देव त्यातील विविध बारकाव्यांनिशी शिकवत आहे, उदा. देवघरामध्ये अनेक चित्रे / मूर्ती आहेत; पण पालट सहजतेने लक्षात यावेत; म्हणून सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या मोठ्या प्रतिमेत त्याने प्राधान्याने पालट घडवून आणले. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष गेले. मागील लेखात माझ्या खोलीतील देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेत वर्ष २०१४ पासून आतापर्यंत झालेल्या पालटांच्या संदर्भातील विश्लेषण आपण पाहिले. ‘माझ्या खोलीतील देवघरातील सूर्यदेवतेच्या प्रतिमेत झालेल्या पालटांचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनीही निरीक्षण केले. त्यांनी केलेली निरीक्षणे आणि पौर्णिमा जवळ आल्यावर सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेत त्यांना जाणवलेले पालट पुढे दिले आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘या लेखामुळे देवतांच्या मूर्तींमध्ये होणार्‍या पालटांमागील शास्त्र वाचकांना समजून त्यांची देवावरील श्रद्धा वृद्धींगत होवो’, अशी ईश्वरचरणी प्रार्थना !’
(भाग २)
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२६.६.२०२६)  

 

सूर्यदेवाच्या चेहर्‍यावरील गंभीरता न्यून होऊन आनंदाची स्पंदने जाणवणे आणि सूर्यतत्त्वामध्ये वाढ होऊन प्रतिमेमध्ये आणखी जिवंतपणा जाणवणे

१७.४.२०२२  

१. पूर्वी सूर्यदेवाचा चेहरा गंभीर दिसणे आणि आता त्याच्या गालावर हास्य दिसू लागणे : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेत पालट होत आहेत. एक मासापूर्वी नव्याने रंगवलेली सूर्यदेवाच्या चेहर्‍याची प्रतिमा गंभीर दिसत होती; पण गेल्या २ आठवड्यांमध्ये तिच्यामध्ये पालट झालेला दिसून आला. आता सूर्यदेवाच्या गालावर हास्य दिसू लागले आहे.

२. विश्लेषण : ‘सूर्यदेवाच्या चेहर्‍यावर हास्य दिसू लागणे’, म्हणजे त्याच्यात आनंदाची स्पंदने येणे. हा पालट सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामुळेच झाला आहे. ते निर्गुण स्थितीला असल्याने त्यांच्यामध्ये आनंद आणि शांती यांची स्पंदने अधिक प्रमाणात आहेत. त्यामुळे सूर्यदेवाच्या चेहर्‍यावरील गंभीरता न्यून होऊन त्यावर आनंदाची स्पंदने स्पष्ट दिसू लागली आहेत. ‘एखाद्या व्यक्तीच्या उच्चतम आध्यात्मिक स्तरामुळे तिच्या अवतीभोवतीच्या निर्जीव घटकांमध्येही कसे पालट होऊ शकतात’, हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेत झालेल्या पालटावरून आपल्याला समजते.

(सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ

११.६.२०२६

१. सूर्यदेवतेच्या चेहर्‍याच्या प्रतिमेमध्ये सगुण तत्त्व पुष्कळ प्रमाणात, म्हणजे ३५ टक्के जाणवले. (सर्वसामान्य मूर्तीमध्ये सगुण तत्त्व साधारणतः ४ टक्के असते.)

२. सूर्यदेवाचा चेहरा पुष्कळ प्रसन्न आणि हसरा जाणवतो. तो हसतांना त्याचे गाल फुगीर झालेले जाणवतात.

३. त्याच्या डोळ्यांत पुष्कळ प्रीती जाणवते.

४. सूर्यदेव पुष्कळ तारक जाणवला. त्याच्यातील तारक तत्त्व ९० टक्के जाणवले. (सर्वसामान्य मूर्तीमध्ये तारक तत्त्व साधारणतः १० टक्के असते.)

५. ‘सूर्यदेवाच्या पापण्यांची उघड-झाप होत आहे’, असे जाणवले. सूर्याच्या पापण्यांची सूक्ष्मातून उघड-झाप होतांना आपल्या पापण्यांवर संवेदना जाणवतात. त्यांवरून ‘सूर्याच्या पापण्यांची किती वेळा उघड-झाप होत आहे ?’, याची संख्या काढता येते. एका मिनिटात सूर्याच्या पापण्यांची ३२ वेळा उघड-झाप झाली.

६. सूर्यदेवाच्या उजव्या डोळ्याची उघड-झाप अधिक वेळा होतांना जाणवली.

७. सूर्यदेवाच्या डावीकडे किंवा उजवीकडे उभे राहिल्यास त्याचे डोळेच नव्हे, तर संपूर्ण चेहरा आपल्याकडे वळलेला जाणवतो. प्रामुख्याने सूर्याचे नाकही आपल्या दिशेने वळलेले जाणवते.

८.श्री सूर्यदेवाय नमः ।’ हा नामजप करत सूर्याच्या कपाळावरून हनुवटीकडे आपली दृष्टी फिरवली, तर सूर्याचे ओठ आणखी हसतांना जाणवतात, तसेच त्याची हनुवटीही हलतांना जाणवते.

९. सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेचे चैतन्य त्याच्या मुखाभोवतीच्या ज्वाळांच्या आकृतीतून प्रक्षेपित होतांना जाणवले.

१०. सूर्यदेवाच्या चेहर्‍याची प्रतिमा हातात घेतल्यावर मला ती पुष्कळ हलकी जाणवली.

११. पेठेत मिळणार्‍या यांसारख्या सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेमध्ये साधारणतः २ टक्के सूर्यदेवाचे तत्त्व असते, तर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील या सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेमध्ये सूर्यदेवाचे तत्त्व २१ टक्के आले आहे.

९.७.२०२६

१. जुलै २०२६ मध्ये सूर्यदेवाच्या प्रतिमेकडे पाहून पुष्कळ शांत वाटते; कारण सूर्यदेवातील शक्तीची स्पंदने अत्यल्प होऊन त्याच्यातील शांतीची स्पंदने आणि तारक तत्त्व वाढले आहे. प्रतिमेतील शांतीची स्पंदने वाढल्यामुळे सूर्यदेवाच्या चेहर्‍यावरील हास्य पूर्वीपेक्षा न्यून झाल्याचे जाणवते.

२. जून २०२६ मध्ये सूर्यदेवाच्या प्रतिमेमधील सूर्यतत्त्व २१ टक्के होते. आता जुलै २०२६ मध्ये सूर्यदेवाच्या प्रतिमेमधील सूर्यतत्त्वामध्ये वाढ होऊन ते २४ टक्के झाले आहे. त्यामुळे आता प्रतिमेमध्ये आणखी जिवंतपणा जाणवतो.

३. जून २०२६ मधील सूर्यप्रतिमेच्या तुलनेत जुलै २०२६ मधील सूर्यप्रतिमेमध्ये प्रीती ५ टक्क्यांनी वाढून ती २५ टक्के झाली आहे.’

– सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ (रसायनशास्त्रामधील पीएच्.डी., मुंबई विद्यापीठ, वय ६२ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.


सूर्यदेवाच्या आनंदाचे प्रमाण वाढत आहे, असे लक्षात येणे

सद्गुरु राजेंद्र शिंदे

११.६.२०२६

१. ‘सूर्यदेवाला पहातांना मला पुष्कळ आनंद जाणवत होता. त्याची आनंदाची स्पंदने मोठ्या प्रमाणात माझ्या देहात जात होती.

२. सूर्यदेवाचा चेहरा अतिशय आनंदी, तेजस्वी, समाधानी आणि हसरा झाला असून ‘सूर्यदेवाकडे पहात रहावे’, असे मला वाटले.

२७.६.२०२६

१. सूर्यदेवाच्या डोळ्यांत मला कृतज्ञताभाव जाणवला.

२. सूर्यदेवाच्या डोळ्यांची उघड-झाप होतांना जाणवली आणि ती एका मिनिटात साधारण ३४ वेळा झाल्याचे मला जाणवले.

३. ‘सूर्यदेवाचा उजवा डोळा अधिक वेळा, तर डावा डोळा अल्प वेळा उघड-झाप करतो’, असे माझ्या लक्षात आले.

४. सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेसमोर डावीकडे किंवा उजवीकडे, असे कोणत्याही दिशेने उभे राहिल्यास ‘सूर्यदेवाची दृष्टी आणि चेहरा आपल्या दिशेने फिरत आहे’, असे वाटले.

५. ‘सूर्यदेवाकडे पहात असतांना त्याचे स्मितहास्य वाढते’, असे लक्षात आले. त्याचे स्मितहास्य अत्यंत समाधानाचे वाटते.

६. श्री सूर्यदेवाय नमः ।’ हा नामजप करत सूर्यदेवाच्या कपाळापासून हनुवटीपर्यत बघत गेल्यावर मला पुढील अनुभूती आल्या.

अ. नामजप करत सूर्यदेवाच्या कपाळापासून खाली बघत ओठांपर्यंत आल्यावर ‘आपले ओठ हसतांना जसे विलग होतात’, तसे सूर्यदेवाचे ओठ विलग झाल्याचे जाणवले.

आ. सूर्यदेवाच्या कपाळापासून हनुवटीपर्यंत येतांना ‘त्याच्या आनंदाचे प्रमाण वाढत आहे’, असे लक्षात आले.

इ. मला स्वतःलाही ‘माझा आनंद वाढत आहे’, असे जाणवले.’

– सद्गुरु राजेंद्र शिंदे (वय ६३ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.


पौर्णिमा जवळ आल्यावर सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेत झालेले पालट !

(२९.६.२०२६ या दिवशी पौर्णिमा होती.)

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

टीप १ – सूर्यदेवाचे ध्यानावस्थेतील डोळे, म्हणजे तो पौर्णिमेच्या कालावधीत वातावरणात वाढणार्‍या वाईट शक्तींशी निर्गुण स्थितीतून लढतो, ते डोळे.

टीप २ – पौर्णिमेच्या कालावधीत वातावरणात वाढणार्‍या वाईट शक्तींशी सूर्यदेव अधिकाधिक निर्गुण तत्त्व धारण करून, तसेच मारक तत्त्व वाढवून लढतो.

पौर्णिमा, तसेच अमावास्या या तिथींच्या कालावधीत वातावरणातील वाईट शक्तींचा जोर वाढतो; म्हणून सनातनचे साधक या दोन्ही तिथींच्या आधीचे २ दिवस आणि नंतरचे २ दिवस, तसेच त्या तिथींच्या दिवशी वाईट शक्तींचा त्रास होऊ नये; म्हणून प्रार्थना अन् नामजप एरव्हीपेक्षा वाढवतात.’ (२८.६.२०२६)


सद्गुरु राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

अ. २६.६.२०२६ या दिवशी सूर्यदेवाच्या चेहर्‍यावर पुष्कळ हास्य होते; पण २७.६.२०२६ या दिवशी सूर्यदेवाच्या चेहर्‍यावरील हास्य आदल्या दिवसापेक्षा अल्प जाणवले, तसेच शक्तीचे प्रमाण वाढल्याचे जाणवले.

आ. याविषयी मी सूक्ष्मातून सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना विचारल्यावर त्यांनी सांगितले, ‘सूर्यदेवाची शक्ती सूक्ष्मातील वाईट शक्तींचे आक्रमण दूर करण्यासाठी कार्यरत झाल्यामुळे असे वाटत आहे. २९.६.२०२६ या दिवशी पौर्णिमा असल्याने २ दिवस आधीपासून वाईट शक्तींचे आक्रमण वाढते. त्यामुळे असे झाले.’ (२८.६.२०२६)

‘हे सर्व सूक्ष्मातील शास्त्र आहे. साधना करणारे हे अनुभवू शकतात. स्थूल दृष्टीने अनुभव घेणार्‍या विज्ञानाला हे न कळणारे आहे. वाचक आणि जिज्ञासू यांना या अनुभूती अनुभवायच्या असतील, तर तेही साधना करून हे अनुभवू शकतात.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२६.६.२०२६)


पुढील अंकांत वाचा…

१. ‘सूर्यदेवाच्या प्रतिमेचा चेहरा अधिकाधिक हसरा दिसणे’, ही गुरुदेवांच्या रामराज्य-स्थापनेच्या कार्याप्रती आनंद व्यक्त करून सूर्यदेवाने दिलेली पावतीच !

२. सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेच्या काही निवडक छायाचित्रांचे लोलकाने परीक्षण करून केलेले वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

३. सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेत झालेल्या पालटांचे सूक्ष्म ज्ञानाद्वारे केलेले अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.