गुरुस्तवन भावांजली

गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष सदर !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी वर्णिलेले सद्गुरुमाहात्म्य आणि त्यातून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

साधकांच्या आध्यात्मिक इच्छा पूर्ण करणारे कामधेनुस्वरूप गुरुदेव !

‘संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,

गुरु हा साधकाशीं साह्य ।

गुरु हा भक्तालागी माय ।

गुरु हा कामधेनु गाय ।

भक्तां घरीं दुभतसे ।।

अर्थ : गुरु साधकाला आत्मज्ञान प्राप्त करून देण्यास साहाय्य करतो. गुरु ही भक्तांची आई आहे. गुरु हा भक्तांची इच्छा पूर्ण करणारी कामधेनु आहे आणि ही कामधेनु भक्ताला ज्ञान देते.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

साधना करतांना साधकांना केवळ स्वतःच्या बळावर प्रारब्धाचे भोग आणि मायेचे अडथळे यांतून पार होणे शक्य नसते. अशा वेळी गुरुदेव साधकांना सर्वतोपरी साहाय्य करतात. ते केवळ दिशादर्शनच करत नाहीत, तर साधकांच्या साधनेतील अडथळे दूर करून त्यांना आत्मज्ञान मिळवण्यासाठी बळ प्रदान करतात. ‘साधकांच्या जीवनातील संकटांचे निवारण करणे आणि त्यांना वात्सल्याचे कवच देऊन आध्यात्मिक प्रगतीकडे नेणे’, हे गुरूंचे प्रेमळ स्वरूप आहे. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव हे केवळ मार्गदर्शन करत नाहीत, तर ते साधकांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंगात माऊलीच्या मायेने त्यांच्या पाठीशी उभे असतात. ‘साधकांच्या मनात काय चालले आहे ?’, हे माऊलीपेक्षाही अधिक केवळ त्यांनाच उमजते.

भक्तांच्या आध्यात्मिक इच्छा पूर्ण करणारी ‘कामधेनु’ बनून गुरु अखंडपणे भक्ताच्या ठायी वास करतात. कामधेनु ज्याप्रमाणे इच्छिलेले सर्वकाही प्रदान करते, त्याचप्रमाणे गुरुकृपा साधकाच्या जीवनातील सर्व उणिवा भरून काढते. जेव्हा साधकांच्या मनात ‘गुरुदेवांना सर्व ठाऊक आहे’, अशी श्रद्धा निर्माण होते, तेव्हा गुरुकृपेची कामधेनु आनंद आणि चैतन्य यांचे दुभते देऊ लागते. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव हे गुरुकृपायोगानुसार साधनेद्वारे साधकांना आत्मज्ञानाचा अनमोल ठेवा प्रदान करत आहेत. अशा कामधेनुस्वरूप श्री गुरूंच्या चरणी कोटी कोटी नमन !’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (२४.७.२०२६) ॐ