विश्वचषक फूटबॉल स्पर्धेमध्ये स्पेनने बलाढ्य अर्जेंटिनाला धूळ चारून विश्वचषकावर स्वतःचे नाव कोरले. त्यामुळे पुढील काही दिवस ‘स्पेनने कशी बाजी मारली ?’, याविषयी लेख, माहिती येईल किंवा चर्चा आयोजित केल्या जातील. अशा कितीही चर्चा झडल्या, तरी ‘स्पेन सांघिक कामगिरीमुळे जिंकला’, याविषयी फूटबॉल जाणकारांमध्ये दुमत नसावे. या सांघिक कामगिरीला ‘टिकी-टाका’ पद्धत म्हणतात. ‘टिकी-टाका’ ही फूटबॉल खेळण्याची एक अशी शैली आहे, ज्यामध्ये शारीरिक बळापेक्षा कौशल्य, अचूकता आणि सांघिक समन्वय यांना सर्वाधिक महत्त्व दिले जाते. येथे संघातील एक खेळाडू हा केंद्रबिंदू नसतो, तर सर्व खेळाडू एकभावनेने त्यांना दिलेली कामगिरी बजावतांना दिसतात. स्पेनचे मुख्य प्रशिक्षक लुईस दु ए फुएन्ते यांनी पारंपरिक ‘टिकी-टाका’चा मूळ गाभा तसाच ठेवून त्यात काही पालट केले आणि त्याचे परिणाम आपण पहात आहोत. स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यातील लढत केवळ खेळाडूंमधील नव्हती, तर ती २ वेगवेगळ्या विचारसरणींची टक्कर होती. एखाद्या संघाचा कणा असणारा मुख्य खेळाडू जेव्हा मैदानात अपयशी ठरतो किंवा प्रतिस्पर्धी संघाकडून पूर्णपणे ‘ब्लॉक’ केला जातो, तेव्हा संपूर्ण संघाची रणनीती कशी कोलमडते, हे या अंतिम सामन्यातून दिसून आले. अर्जेंटिना मेस्सीवर अधिक अवलंबून होता, तर स्पेन कुठल्याही एका ‘स्टार’ खेळाडूवर अवलंबून न रहाता सांघिक खेळ करून जगज्जेता बनला. अर्जेंटिनाच्या फूटबॉल संघाच्या संदर्भात जे घडले, ते भारताच्या क्रिकेट संघाविषयीही वारंवार घडतांना दिसते. अशा ‘स्टार’ खेळाडूंमुळे काही सामने जिंकता येतात; मात्र इतिहास रचायचा असेल, तर सांघिक कामगिरीविना पर्याय नाही.
वास्तविक भारतात अराजक माजले असतांना फूटबॉल किंवा क्रिकेट यांसारखे खेळ पहाण्यात जनतेने वेळ वाया घालवणे, हे राष्ट्राला परवडणारे नाही. महत्त्वाचे म्हणजे फूटबॉलमध्ये भारताचे पहिल्या १०० देशांमध्येही स्थान नाही. त्याही पुढे जाऊन ना स्पेन भारताच्या जवळचा, ना अर्जेंटिना ! त्यामुळे या दोघांपैकी कुणीही जरी जिंकला, तरी आपल्याला काय फरक पडणार ? तरीही भारतातील बर्याच लोकांनी रात्रभर जागून या अंतिम सामन्याचा आनंद घेतला. भारतातही फूटबॉल ज्वर चढला असून अंतिम निकालामुळे देशातील मेस्सीच्या चाहत्यांचा हिरमोड झाला आहे, तर स्पेनप्रेमी जल्लोष करत आहेत. यामुळे काय साध्य होत आहे ? असो. सांघिक खेळ, हे सूत्र केवळ खेळापुरते मर्यादित नाही. जेव्हा एखादा संघ ‘एकखांबी तंबू’ बनतो, तेव्हा इतर खेळाडूंची स्वतःची निर्णयक्षमता आणि सर्जनशीलता गळून पडते. ते केवळ त्या एका ‘मसिहा’कडे आशेने पहात रहातात. फूटबॉलच्या अत्यंत वेगवान खेळात स्वतःहून पुढाकार घेण्याची वृत्ती संपली की, पराभव निश्चित असतो. हाच नियम देशाच्या जडणघडणीलाही तंतोतंत लागू होतो.
देशाचा उत्कर्ष सांघिक कामगिरीवर अवलंबून
भारत जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न पहात आहे. स्वप्न पहाणे चुकीचे नाही; मात्र ते सत्यात उतरवणार कसे ?, हा कळीचा प्रश्न आहे. महासत्ता बनण्यासाठी अपार कष्ट करावे लागतील, त्यासाठी त्याग आणि पदरमोड केल्याविना पर्याय नाही. ‘भारताचा उत्कर्ष व्हावा’, असे सर्वांनाच वाटते; मात्र त्यासाठी कष्ट घेण्यास नागरिक सिद्ध नाहीत. ‘सरकारने त्याच्या स्तरावर योग्य, जलद गतीने आणि पारदर्शक निर्णय घेऊन ते कार्यान्वित करावेत’, असे जनतेला वाटते; मात्र या योजना यशस्वी होण्यासाठी स्वतः त्यात सहभागी होण्याविषयी जनता उदासीन असते. इतिहास साक्षी आहे की, कोणत्याही देशाचा विकास हा केवळ एका व्यक्तीच्या करिष्म्याने होत नाही, तर तो तेथील नागरिकांच्या सामूहिक योगदानाने होतो. जनता केवळ ५ वर्षांतून एकदा मतदान करून ‘आमचे दायित्व संपले’, असे मानते. त्यानंतर देशात जे काही चांगले-वाईट घडेल, त्याचे श्रेय किंवा दोष आपण थेट पंतप्रधान किंवा सरकार यांना देतो. ही वृत्ती पालटायला हवी. स्वच्छता राखण्यापासून ते कायदा पाळण्यापर्यंत प्रत्येक नागरिकाचे योगदान देशाच्या विकासात मोजले जाते.
‘सर्व काही एकच व्यक्ती करेल’ किंवा ‘एकच नेता देशाला तारू शकतो’ हा अती अवलंबित्ववाद लोकशाही आणि देशाचा सर्वांगीण विकास यांच्यासाठी चिंताजनक ठरू शकतो. जेव्हा एखादी संस्था, पक्ष किंवा देश केवळ एकाच व्यक्तीवर अवलंबून रहातो, तेव्हा त्या व्यक्तीच्या मर्यादा या संपूर्ण देशाच्या मर्यादा बनतात. अर्जेंटिना मेस्सीच्या रणनीतीवर अवलंबून राहिल्याने जसा मैदानात कोंडीत सापडला, तसेच ‘सरकार देशासाठी काय करत आहे ?’, असे विचारत बघ्याची भूमिका घेणार्या नागरिकांमुळे देशाच्या विकासाच्या गतीला मर्यादा येऊ शकतात. हेच पहा ना, मुसळधार पावसामुळे मुंबईच्या जुहूच्या समुद्रकिनार्यावर कचरा, प्लास्टिक पिशव्या आणि अन्य साहित्य आले. याविषयी मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराचा खरपूस समाचार घेण्यात आला; मात्र नागरिकांच्या बेशिस्तपणाविषयी कुणी काहीही बोलले नाही. सरकार बराच काळ ‘ओला कचरा’, ‘सुका कचरा’ यांविषयी प्रबोधन करत असते; मात्र नित्यपणे याचे पालन किती नागरिक करतात ? सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’चा बोजवारा उडाल्याची चर्चा बर्याचदा होते; मात्र हे अभियान यशस्वी होण्यासाठी सरकार जेवढे उत्तरदायी होते, तेवढे भारतीय उत्तरदायी नाहीत का ? भारत स्वच्छ करण्यासाठी कितीही योजना राबवा, भारतातील प्रत्येक नागरिक जोपर्यंत ‘भारताला स्वच्छ आणि सुंदर करायचे आहे’, हे मनावर घेत नाही, तोपर्यंत ही योजना यशस्वी होणार नाही.
नागरी कर्तव्ये चोख बजावणे आवश्यक
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे देश चालवणे हे केवळ सरकारचे किंवा एका नेत्याचे दायित्व नाही. तो एक ‘सांघिक खेळ’ आहे, जिथे १४० कोटी जनता हाच खरा संघ आहे. जोपर्यंत देशातील प्रत्येक नागरिक, उद्योजक, शेतकरी, शिक्षक आणि तरुण आपापल्या क्षेत्रात सर्वोत्तम योगदान देत नाहीत, तोपर्यंत आपण जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न पूर्ण करू शकत नाही. केवळ नेत्यावर अवलंबून राहून निष्क्रीय रहाण्याऐवजी नागरिकांनी त्यांची नागरी कर्तव्ये चोख बजावणे आवश्यक आहे.
खेळपट्टी असो वा देश, विजय नेहमी संघाचा होतो, एका व्यक्तीचा नाही. भारताला जर प्रगतीच्या शिखरावर पोचायचे असेल, तर आपल्याला ‘एकल नेतृत्व’ संकल्पनेतून बाहेर पडून संपूर्ण देशाच्या सांघिक शक्तीचा वापर करावा लागेल. जेव्हा देशातील प्रत्येक व्यक्ती स्वतःला या ‘टीम इंडिया’चा सक्रीय खेळाडू समजेल, तेव्हाच भारताचा खरा उत्कर्ष होईल.
‘टिकी-टाका’ आपल्याला हेच शिकवतो की, वैयक्तिक स्वार्थ किंवा अहंकार बाजूला सारून जेव्हा संपूर्ण संघ एकाच ध्येयासाठी अचूक समन्वयाने काम करतो, तेव्हा यश निश्चित असते. भारताला जागतिक स्तरावर चमकण्यासाठी याच सांघिक शक्तीची आवश्यकता आहे. फूटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातून भारताला मिळालेला हा सर्वांत मोठा धडा आहे.



Russia Ukraine War : भारतीय खलाशी असलेल्या नौकेवर रशियाकडून आक्रमण : ६ जण ठार
US Iran War : इराणमधील भारतियांनी शक्य तितक्या लवकर भारतात परतावे ! – भारत
पाक सैन्याने कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांचे मृतदेह हिंदूंच्या स्वाधीन केले ! – Maulana Fazlur Rehman
संपादकीय : ‘कॉकरोच’वर शाईफेक !
पाकव्याप्त काश्मीरची भारतात ‘घरवापसी’ करतांना भारताची भूमिका काय असावी ?
पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तान येथील जनआंदोलनांचे भारताच्या दृष्टीकोनातून सामरिक विश्लेषण