‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या कलांतून ईश्वरप्राप्तीसाठी साधना’, याचे प्रास्ताविक विवेचन !
४ सप्टेंबर २०२५ या दिवसापासून प्रत्येक गुरुवारी चालू झालेल्या लेखमालेत आपण ‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य’, या कलांची माहिती घेत आहोत. या कलांच्या सादरीकरणाचा उद्देश काळाच्या प्रभावामुळे पालटत असला, तरी ‘कलेकडे केवळ कला म्हणून न पहाता कलेतून आध्यात्मिक उन्नती कशी साधावी’, हे येथे पाहूया. (लेखांक २२)
‘कला-उपासकाला साधनेत प्रगती करण्यासाठी गुरुकृपायोगानुसार अष्टांग साधनेतील एक अंग असलेल्या सत्सेवेविषयी जाणून घेत आहोत. २ जुलै या दिवशीच्या भागात आपण ‘सत्सेवा म्हणजे काय ? सेवा आणि काम यांत कोणता भेद आहे ? काळानुसार सर्वोत्तम सत्सेवा कोणती ?’ इत्यादी पाहिले. लेखाच्या या भागात आपण ‘साधक-कलाकाराला त्याच्या साधनेत होणारा सत्सेवेचा लाभ आणि कला क्षेत्रातील मान्यवर कलाकारांनी सांगितलेले सत्सेवेचे महत्त्व’, जाणून घेणार आहोत.
(भाग २)
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/1057084.html

१. कला-उपासकाची व्यष्टी आणि समष्टी साधना
काळानुसार साधनेचे २ प्रकार सांगितले आहेत – १. व्यष्टी साधना आणि २. समष्टी साधना. काळानुसार व्यष्टी साधनेला ३५ टक्के महत्त्व आहे, तर समष्टी साधनेला ६५ टक्के महत्त्व आहे. कला-उपासकही या दोन्ही प्रकारांतून साधनारत असतो.

१ अ. कला-उपासकाची व्यष्टी साधना : कला शिकतांना / कलेचा सराव करतांना कला-उपासकाने स्वतःपुरती केलेली साधना, उदा. नामजप करणे, ध्यान लावणे, सात्त्विक ग्रंथांचे वाचन करणे इत्यादी.
१ आ. कला-उपासकाची समष्टी साधना : कलेच्या माध्यमातून साधना करतांना कला-उपासकाने स्वतःसह समाजालाही ती साधना शिकवणे, तिचा प्रसार करणे, उदा. ‘कलेला साधनेची जोड कशी द्यावी ?’, हे समाजातील कला क्षेत्रातील लोकांपर्यंत प्रवचने, शिबिरे इत्यादी माध्यमांतून पोचवणे इत्यादी.
‘सत्सेवा’ ही साधक-कलाकाराच्या समष्टी साधनेच्या अंतर्गत येते. त्यामुळे साधना करतांना साधक-कलाकाराने तिला सत्सेवेची जोड दिल्यास त्याची आध्यात्मिक प्रगती शीघ्र होते.
२. सत्सेवेमुळे साधक-कलाकाराला त्याच्या साधनेत होणारे लाभ !
२ अ. सत्सेवेच्या माध्यमातून अष्टांग साधना होत असणे : गुरुकृपायोगानुसार अष्टांग साधनेचे सर्व पैलू सत्सेवेच्या माध्यमातून साध्य करता येतात.
१. सेवा ‘नामजपा’सह केली जाते.
२. सेवेच्या माध्यमातून ‘सत्’मध्ये रहाता येत असल्याने तो एक प्रकारचा ‘सत्संग’च असतो.
३. सेवेच्या माध्यमातून तन, मन आणि धन अर्पण झाल्याने साधकाचा ‘त्याग’ होतो.
४. सेवा करतांना समवेतच्या साधकांविषयीही आपल्यात निरपेक्ष प्रेम, म्हणजेच ‘प्रीती’ निर्माण व्हायला लागते.
५. सेवा करतांना आपल्याला स्वभावदोष आणि अहं यांवर मात करायलाही जमू लागते.
६. सेवेच्या माध्यमातून या सर्व गोष्टी घडत गेल्याने ईश्वराप्रतीचा ‘भाव’ही वाढण्यास साहाय्य होते.
२ आ. सत्सेवा एकाग्रतेने आणि भावपूर्ण केल्याने ‘स्व’ला विसरता येणे : ज्या वेळी भगवंताची सेवा एकाग्रतेने व्हायला लागते, त्या वेळी ‘आपल्या आवडी-नावडी न्यून होत आहेत’, असे आपल्या लक्षात येते. सेवा ईश्वराच्या साहाय्याने करत असल्याने आपल्यात ‘भगवंतच सेवा करून घेत आहे’, हा भाव निर्माण होऊ लागतो. त्यामुळे ‘मी ही सेवा केली’, हा कर्तेपणाही न्यून होऊ लागतो. सेवा करतांना येत असलेल्या विविध अनुभूतींमुळे ईश्वरावरील श्रद्धा वाढायला साहाय्य होते. परिणामी साधक-कलाकाराचा ‘स्व’ (अहंकार) ईश्वरचरणी अर्पण होऊ लागतो.
२ इ. तन, मन, धन आणि बुद्धी यांचा त्याग होणे : ईश्वरी सेवेसाठी शरीर झिजवावे लागते. त्यामुळे शरिराचा (तनाचा) त्याग होऊ लागतो. सेवेमुळे मन नामस्मरण किंवा सेवा यांच्या, म्हणजे सत्च्या विचारांमध्ये राहू लागल्याने मनातील अन्य विचारांचे प्रमाण न्यून होऊ लागते. त्यामुळे मनाचा त्याग होऊ लागतो. ‘सेवा अधिक परिणामकारक कशी करता येईल ?’, यासाठी आपली बुद्धी कार्यरत रहाते. त्यामुळे भगवंत आपल्याला नवनवीन सूत्रे सुचवू लागतो आणि आपली बुद्धीही अर्पण व्हायला लागते. सेवेच्या निमित्ताने आवश्यकतेनुसार धनाचा त्यागही होऊ लागतो.
२ ई. सत्सेवेच्या माध्यमातून ईश्वरी चैतन्य ग्रहण करता येणे : सत्सेवेच्या माध्यमातून तन आणि मन यांचा त्याग होऊ लागल्यावर कला-उपासकाची वृत्ती सात्त्विक होऊ लागते. त्यामुळे भगवंताची सकारात्मक ऊर्जा आणि ईश्वरी चैतन्य कला-उपासकाकडे आकृष्ट होऊ लागते. त्यामुळे कला-उपासकाची साधनेत शीघ्र प्रगती होऊ लागते.
२ उ. अनुसंधान टिकून रहाणे : दैनंदिन व्यवहारातील कामांमध्ये आपल्याला भगवंताचा विसर पडतो. सत्सेवेमुळे भगवंताशी अनुसंधान टिकून रहाण्यास साहाय्य होते.
२ ऊ. अहंकार न्यून होणे : व्यवहारात ‘मी एक प्रतिष्ठित व्यक्ती किंवा कलाकार आहे’, यांसारख्या विचारांमुळे आपल्यातील ‘मी’पणा कार्यरत रहातो; पण विविध प्रकारच्या (शारीरिक आणि बौद्धिक स्तरांवरील) सेवांमुळे ‘मी ईश्वराचा सेवक आहे’, या भावाने सेवा होऊ लागते अन् त्यामुळे कला-उपासकाचा अहंकार न्यून होण्यास साहाय्य होते.
२ ए. संघटितपणासह व्यापकता वाढून अन्य गुणांचीही वृद्धी होणे : समष्टी सेवा करतांना सहसाधकांच्या समवेत हळूहळू सगळ्या साधकांविषयी आपल्या मनात आपुलकी आणि प्रेमभाव यांची वृद्धी व्हायला लागते. त्यामुळे कोणतीही सेवा आपोआप संघटितपणाने होऊ लागते. याचाच परिणाम म्हणजे कला-उपासकाला ‘मी’ कडून ‘आम्ही’, या व्यापक विचाराकडे जाता येते, तसेच त्याचा इतरांकडून शिकण्याचा प्रयत्न होऊ लागतो आणि त्याची शिकण्याची वृत्ती वाढते. ‘निरपेक्ष प्रेम आणि इतरांचा विचार करणे’, यांसारखे गुणही वाढायला साहाय्य होते.
३. समाजातील मान्यवर कलाकारांनी केलेली सत्सेवा आणि त्यांनी सांगितलेले सत्सेवेचे महत्त्व !
३ अ. भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी केलेली गुरुसेवा ! : पं. भीमसेन जोशी यांना त्यांचे गुरु सवाई गंधर्व यांनी साधारण एक वर्ष गायन शिकवले नाही. त्या वेळी पं. भीमसेन जोशी यांची गायन शिकण्याची तळमळ एवढी होती की, त्यांनी एक वर्ष गुरुगृही राहून गुरूंची सेवा मनोभावे केली. ते गुरुगृही राहून सर्व प्रकारची सेवा, उदा. प्रतिदिन मैलभर (साधारण दीड कि.मी.) दूरवरून पाणी आणणे, गुरूंच्या घरातील कामे करणे, ‘गुरूंना काय हवे-नको’, ते पहाणे इत्यादी सेवाभावाने करत होते. तेव्हा ‘गायन केवळ कानांनी श्रवण करणे’, एवढेच ते करत होते. त्यानंतर साधारण वर्षभराने त्यांच्या गुरूंनी त्यांना गायन शिकवायला आरंभ केला. गुरुगृही राहून गुरूंची सेवा करून पं. भीमसेन जोशी यांनी त्यांचे मन जिंकले.
३ आ. संगीत तज्ञ आणि संत पू. पुट्टराज गवई यांनी गुर्वाज्ञा म्हणून वेद, अध्यात्म अन् संगीत यांचा प्रसार करणे : धारवाड (कर्नाटक) येथील व्हायोलिन वादक पं. बी.एस्. मठ हे त्यांचे गुरु गदग (कर्नाटक) येथील संगीत तज्ञ आणि संत पू. पुट्टराज गवई यांच्याविषयी सांगतांना ते म्हणाले, ‘‘पू. पुट्टराज गवई यांना त्यांचे गुरु पू. पंचाक्षरी गवई यांनी सांगितले होते की, तुला पुढे जाऊन लोकांना संगीत आणि अध्यात्म शिकवायचे आहे. त्यामुळे गुर्वाज्ञा म्हणून पू. पुट्टराज गवई यांनी त्यांच्या गुरूंप्रमाणे गावोगावी जाऊन लोकांमध्ये वेद, अध्यात्म आणि संगीत यांचा प्रसार केला.’’
३ इ. आपल्या शिष्यांनाही संगीत आणि अध्यात्म यांच्या प्रसारासाठी सिद्ध करणारे पू. पुट्टराज गवई ! : धारवाड (कर्नाटक) येथील व्हायोलिन वादक पं. बी.एस्. मठ म्हणाले, ‘‘जेव्हा कधी पू. पुट्टराज गवई कीर्तन आणि प्रवचन यांच्या निमित्ताने बाहेर जायचे, तेव्हा ते आपल्या विद्यार्थ्यांनाही समवेत घेऊन जायचे. ‘कीर्तन आणि प्रवचन कसे करायचे ?’, हे त्यांचे विद्यार्थी त्या निमित्ताने शिकतील’, असा त्यांचा उद्देश होता. त्यांनी त्यांच्या आश्रमात संगीत आणि अध्यात्म या दोन्हींची योग्य सांगड घातली होती.’’
३ ई. गुरुसेवेसाठी तत्पर असणारे मुंबई येथील ज्येष्ठ पेटीवादक पं. विश्वनाथ कान्हेरे ! : मुंबई येथील ज्येष्ठ पेटीवादक पं. विश्वनाथ कान्हेरे म्हणाले, ‘‘एकदा मी पं. जितेंद्र अभिषेकीबुवा यांच्यासह आगगाडीने प्रवास करत होतो. तेव्हा रात्री १ वाजता त्यांनी मला त्यांचे पाय चेपायला सांगितले. मी लगेच उठून त्यांचे पाय चेपले. पूर्वीच्या शिष्यांचा गुरूंप्रती पुष्कळ भाव असायचा. त्यामुळे शिष्य गुरुसेवेसाठी तत्पर असायचे; पण आताच्या विद्यार्थ्यांमध्ये गुरूंप्रती असा भाव अभावानेच दिसून येतो.’’
३ उ. पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांनी केलेली संगीताविषयीची समष्टी सेवा !
३ उ १. संगीत सर्वसामान्यांपर्यंत पोचवणे : त्या काळात शास्त्रीय संगीत केवळ राजदरबारात किंवा मर्यादित लोकांमध्ये होते. पं. विष्णु पलुस्कर यांनी ते सामान्य जनतेसाठी खुले केले. त्यांनी वर्ष १९०१ मध्ये आताच्या पाकिस्तानातील लाहोर येथे श्री दत्तप्रेरणेने ‘गांधर्व महाविद्यालया’ची स्थापना केली. हे संगीत शिक्षणाचे पहिले सार्वजनिक संस्थान होय.
३ उ २. भजने आणि देशभक्तीपर गीते लोकप्रिय करणे : पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांनी ‘रघुपती राघव राजा राम ।’, यांसारखी भजने देशभर प्रसिद्ध केली, तसेच त्यांनी ‘वन्दे मातरम् ।’ यांसारखी देशभक्तीपर गीते संगीतबद्ध करून लोकांमध्ये देशभक्तीची भावना वाढवली.
३ उ ३. त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीत लोकांपर्यंत पोचवून ते शिक्षण आणि समाजसुधारणा यांचे साधन बनवले.
३ ऊ ४. रामनाम-उपासनेचा प्रसार करणे : ‘पं. विष्णु पलुस्कर यांनी त्यांच्या उत्तरायुष्यात स्वत:च्या मधुर कंठाचा आणि संगीत कलेचा उपयोग रामायणाचे पठण अन् रामनामाचा प्रचार यांसाठी केला’, हे सर्वश्रुतच आहे.
या लेखाच्या पुढील भागात आपण ‘साधक-कलाकार कोणकोणत्या प्रकारे सत्सेवा करू शकतो ?’, याचे विस्तृत विवेचन जाणून घेणार आहोत.’ (क्रमशः)
संग्राहक : सौ. भक्ती विश्वनाथ कुलकर्णी, संगीत-अभ्यासक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (२९.६.२०२६
ईश्वरप्राप्तीसाठी साधना प्रथम आणि नंतर तात्त्विक माहितीचे वाचन
२३ वर्षांपूर्वी परात्पर गुरुदेवांनी ‘गाडगीळबाईंना (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना) भेटून या, तुम्हाला आनंद मिळेल’, असे साधकांना सांगणे आणि साधकांनी ते अनुभवणे
सेवा करतांना मनात भाव असेल, तरच ती सेवा खर्या अर्थाने परिपूर्ण होते ! – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
‘स्वतःची वर्तमानातील मनाची स्थिती पूर्णपणे स्वीकारणे’ ही मनाला निर्मळ करण्याची पहिली पायरी आहे !
या साधकांनो, परत फिरा रे, घराकडे अपुल्या !