‘ओव्हेरियन सिस्ट’ आणि आयुर्वेद

स्त्रीरोग आणि आयुर्वेद (लेखांक २२)

सध्या अनेक स्त्रियांमध्ये ‘ओव्हेरियन सिस्ट’ (Ovarian Cyst) ही समस्या वाढतांना दिसत आहे. विशेषतः अनियमित जीवनशैली, ‘हार्मोनल’ (संप्रेरक) असंतुलन, ताणतणाव आणि चुकीचा आहार यांमुळे ही समस्या अधिक प्रमाणात आढळते. अनेक वेळा ‘सिस्ट’ लहान आणि निरुपद्रवी असते; परंतु काही प्रकरणांमध्ये पाळीतील अनियमितता, वेदना अन् गर्भधारणेत अडथळे निर्माण होऊ शकतात. आयुर्वेद या समस्येकडे केवळ गाठ म्हणून न पहाता संपूर्ण दोष संतुलन आणि स्त्रीच्या प्रजनन आरोग्याच्या दृष्टीने विचार करतो.

लेखांक  २१ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1056282.html

१. ‘ओव्हेरियन सिस्ट’ म्हणजे काय ?

अंडाशयामध्ये (Ovary) द्रवयुक्त पिशवीसारखी रचना सिद्ध होणे, म्हणजे ‘ओव्हेरियन सिस्ट.’ ही ‘सिस्ट’ एक किंवा दोन्ही अंडाशयात असू शकते. बहुतांश ‘फंक्शनल सिस्ट’ नैसर्गिकरित्या न्यून होतात; परंतु काही वेळा त्या वाढू शकतात.

२. आयुर्वेदात या अवस्थेचा संबंध मुख्यतः

कफदोष वाढ, आर्तव वह स्रोतस दुष्टी, अपान वात विकृती यांच्याशी जोडला जातो.

३. प्रमुख लक्षणे

मासिक पाळी अनियमित होणे, ती उशिरा येणे, पोटाच्या खालच्या भागात वेदना होणे, पोट फुगल्यासारखे वाटणे, वजन वाढणे; मुरुम, केस वाढणे (हार्मोनल लक्षणे), गर्भधारणेत अडचणी ही लक्षणे होत. काही स्त्रियांमध्ये प्रारंभी कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.

४. आयुर्वेदानुसार कारणमीमांसा

वैद्या (सौ.) सारिका नीलेश लोंढे

अ. कफदोष वाढ : शरिरात अवरोध निर्माण होऊन ‘सिस्ट’ सिद्ध होण्यास साहाय्य होते.

आ. अपान वात विकृती : अंडोत्सर्जन प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात.

इ. मंद अग्नी आणि आम : अपूर्ण पचनामुळे शरिरात विषद्रव्य (आम) सिद्ध होतात.

ई. मानसिक ताण : ‘हार्मोनल’ संतुलन बिघडवतो.

५. आयुर्वेदानुसार चिकित्सेत विचार करतांना

वैद्य ‘सिस्टचा आकार आणि प्रकार, पाळीचा इतिहास, वजन अन् ‘हार्मोनल’ लक्षणे, पचनशक्ती (अग्नी), गर्भधारणेची योजना आहे का ? आणि प्रकृती (वात-पित्त-कफ)’, या गोष्टी पहातात.

६. मुख्य उद्देश

कफ शमन + स्रोतस शुद्धी + हार्मोनल संतुलन + अंडोत्सर्जन सुधारणा

७. आयुर्वेदाची उपचारपद्धत

अ. औषधी उपचार (वैद्यकीय सल्ल्यानुसार)

१. कांचनार गुग्गुळ : ‘सिस्ट’ न्यून करण्यासाठी

२. अशोक : पाळी संतुलित

३. लोध्र : स्त्रीरोगांमध्ये उपयुक्त

४. त्रिफळा : शुद्धी आणि पचन सुधारणा

५. मंजिष्ठा : रक्तशुद्धी

आ. पंचकर्म

१. विरेचन : पित्त आणि कफ संतुलन

२. बस्ती : अपान वात नियंत्रण

३. उद्वर्तन : स्थूलता अन् कफ न्यून करण्यासाठी

८. घरगुती आयुर्वेदाचे उपाय

प्रतिदिन कोमट पाणी पिणे, नियमित व्यायाम / चालणे, योग (भुजंगासन, ‘बटरफ्लाय’ आसन (तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली)), ताण न्यून करण्यासाठी ध्यान, अधिक वेळा उपाशी रहाणे किंवा crash dieting टाळावे.

९. आहार मार्गदर्शन

अ. काय घ्यावे ? : फळभाज्या, फळे, मूग, हलका आहार, कोमट पाणी

आ. काय टाळावे ? : जंक फूड (पिझ्झा, बर्गर), अधिक साखर, बेकरी पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स (शीतपेये)

१०. जीवनशैलीविषयी मार्गदर्शन

नियमित झोप घेणे, उशिरापर्यंत जागरण टाळणे, वजन नियंत्रण करणे आणि मानसिक ताण न्यून ठेवणे आवश्यक आहे.

११. निष्कर्ष

‘ओव्हेरियन सिस्ट’ ही समस्या आज अनेक स्त्रियांमध्ये दिसून येत असली, तरी योग्य वेळी निदान आणि उपचार केल्यास ती नियंत्रणात ठेवता येते. आयुर्वेद या समस्येवर मूळ कारणांवर आधारित उपचार करून दोष संतुलन, ‘हार्मोनल’ समतोल आणि प्रजनन आरोग्य सुधारण्यावर भर देतो. योग्य आहार, दिनचर्या आणि वैद्यकीय मार्गदर्शन यांच्या साहाय्याने स्त्री निरोगी जीवन जगू शकते.

– वैद्या (सौ.) सारिका नीलेश लोंढे, निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल, भोसरी, पुणे.

🪷 ‘स्त्री रोग आणि आयुर्वेद’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा 🪷