‘दुःखापासून आनंदापर्यंत जाणिवेचे विविध स्तर आहेत. प्रत्येक स्तरानुसार आपल्या मनात विशिष्ट भावना उमटतात, तसेच जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटतो. प्रस्तुत लेखात जाणिवेचे विविध स्तर आणि त्यांचा ग्रहयोगांशी असलेला संबंध, यांचे विवेचन केले आहे. १२ जुलै या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘जाणिवेशी संबंधित तात्त्विक विवेचन’, याविषयी वाचले, तसेच ‘व्यक्तीच्या जाणिवेचे विविध स्तर आणि त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध’, यातील काही सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
(भाग २)
या लेखाचा भाग १ वाचणीसाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/1060389.html

२. व्यक्तीच्या जाणिवेचे विविध स्तर आणि त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध
२ उ. विकासप्रधान स्तर : ‘यामध्ये अनुक्रमे ‘धैर्य’, ‘सज्जता’, ‘स्वीकारण्याची वृत्ती’ आणि ‘ज्ञान’ हे स्तर आहेत. या स्तरांवर व्यक्तीचा मानसिक आणि बौद्धिक विकास घडतो, तसेच व्यक्ती सकारात्मक, कृतीशील अन् प्रगल्भ होते. तिच्यात दायित्वाची जाणीव निर्माण होते, तसेच तिच्यात सत्याला जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण होते. तिला जीवन म्हणजे सुसंवाद, समृद्धी, उन्नती आणि ज्ञान यांचे साधन वाटते. ती ईश्वराला दयाळू, कृपावत्सल, प्रेरणादायी आणि ज्ञानस्वरूप मानते.
२ उ १. धैर्य (Courage) : या स्तरावर व्यक्ती स्वतःमध्ये पालट घडवण्यास सिद्ध होते. ती परिस्थितीला दोष न देता ‘परिस्थिती सुधारण्यासाठी मी काय प्रयत्न करू ?’, असा विचार करते. ती तिच्या जुन्या सवयी, संकुचित प्रवृत्ती, नकारात्मक मानसिकता आदींमध्ये पालट करण्याचा प्रयत्न करते. ती स्वतःचे दायित्व स्वतः घेते. ती केवळ कल्पना आणि तर्क करण्यापेक्षा ठोस प्रयत्न करण्यावर भर देते.
२ उ २. सज्जता (Willingness) : या स्तरावर व्यक्तीमध्ये शिकण्याची वृत्ती निर्माण होते. तिचे पूर्वग्रह न्यून होऊन ती नवीन विचार, सिद्धांत, तथ्य आदी स्वीकारण्यास सिद्ध होते. ती परस्परविरोधी गोष्टींमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करते. ती कृतीशील, सकारात्मक आणि उत्साही असते. तिचा स्वतःवर विश्वास असतो, तसेच ती भविष्यासंबंधी सकारात्मक असते.
२ उ ३. स्वीकारण्याची वृत्ती (Acceptance) : या स्तरावर व्यक्तीमध्ये वैचारिक प्रगल्भता निर्माण होते. ‘अमुक गोष्ट अमुक प्रकारेच व्हायला हवी’, असा तिचा आग्रह न्यून होतो. ती अन्य व्यक्तींच्या दृष्टीकोनांचा आदर करते. ती तटस्थ राहून आणि समस्यांच्या मुळाशी जाऊन त्यांचे कारण शोधते. ती अन्य लोकांना त्यांच्या गुण-दोषांसहित स्वीकारते. त्यामुळे तिचा मानसिक संघर्ष न्यून होतो आणि नात्यांमध्ये सुसंवाद निर्माण होतो.
२ उ ४. ज्ञान (Reason) : या स्तरावर व्यक्तीमध्ये सत्य शोधण्याची तळमळ निर्माण होते. ती विश्वातील भौतिक, मानसिक आणि आध्यात्मिक तथ्यांची चिकित्सा करते. तिला विश्वरूपी कोडे उलगडण्याची उत्सुकता असते. ती विश्वाच्या अस्तित्वामागील अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करते. तिच्यासाठी ‘ज्ञान’ हीच जीवनाची प्रेरणा असते. तिला समाजाला योग्य ज्ञान देण्याची तळमळ असते.
२ ऊ. विकासप्रधान स्तरांशी संबंधित ग्रहयोग
२ ऊ १. ‘रवि’, ‘मंगळ’ आणि ‘गुरु’ यांचे परस्परयोग : कुंडलीत ‘रवि’, ‘मंगळ’ आणि ‘गुरु’ यांचे एकमेकांशी महत्त्वाचे योग असल्यास व्यक्तीमध्ये महत्त्वाकांक्षा, धाडस, निश्चयीपणा, उद्योगशीलता, निर्णयक्षमता आणि उत्तम कार्यक्षमता ही वैशिष्ट्ये असतात. व्यक्तीमध्ये मोठे कार्य करण्याची क्षमता असते. ती सकारात्मक आणि आशावादी असते.
२ ऊ २. ‘गुरु’ ग्रहाचा ‘चंद्र’ आणि ‘शुक्र’ यांच्याशी योग : ‘गुरु’ ग्रह स्वभावात व्यापकता दर्शवतो. कुंडलीत गुरु ग्रहाचा ‘चंद्र’ आणि ‘शुक्र’ या ग्रहांशी शुभयोग असल्यास व्यक्तीमध्ये प्रेमभाव, जिव्हाळा, सहानुभूती, सद्भाव, श्रद्धा, ऐकण्याची वृत्ती, स्वीकारण्याची वृत्ती, इतरांना साहाय्य करणे आदी गुण असतात. तिचे मन आनंदी, उत्साही आणि मोकळे असते. ती समाजाशी चांगले संबंध प्रस्थापित करते.
२ ऊ ३. ‘गुरु’ ग्रहाचा ‘रवि’ आणि ‘बुध’ यांच्याशी योग : ‘गुरु’ ग्रह ज्ञानाशीही संबंधित आहे. कुंडलीत गुरु ग्रहाचा ‘रवि’ आणि ‘बुध’ या ग्रहांशी शुभयोग असल्यास व्यक्तीमध्ये जिज्ञासा, अभ्यासूवृत्ती, चिकित्सकपणा, सत्य जाणण्याची तळमळ, शिकण्याची वृत्ती आदी गुण असतात. ती ज्ञानाची उपासक असते. ती इतरांना शिक्षित करण्यासाठी योगदान देते.
२ ऊ ४. ‘गुरु’ आणि ‘शनि’ यांचा अन्य ग्रहांशी योग : ‘गुरु’ ग्रह ज्ञानाचा, तर ‘शनि’ ग्रह अंतर्मुखतेचा कारक आहे. कुंडलीत गुरु आणि शनि या ग्रहांचा ‘बुध’, ‘शुक्र’ किंवा ‘रवि’ यांच्याशी शुभयोग असल्यास व्यक्तीमध्ये सामंजस्य, विचारीपणा, दायित्वाची जाणीव, विश्वासार्हता, तटस्थता, प्रामाणिकपणा, साधेपणा, दूरदृष्टी आदी गुण असतात. व्यक्ती तिच्या प्रगल्भतेमुळे इतरांना योग्य दिशा दाखवण्यास सक्षम असते.
२ ए. आध्यात्मिक स्तर : यामध्ये अनुक्रमे ‘प्रीती’, ‘आनंद’, ‘शांती’ आणि ‘आत्मानुभूती’ हे स्तर आहेत. हे आध्यात्मिक स्तर आहेत. या स्तरांवर व्यक्ती ईश्वराच्या जवळ पोचते. तिचा अहं न्यून होऊन तिच्यात व्यापकता येते. तिला जीवन, म्हणजे ईश्वराचे सगुणातील व्यक्त रूप किंवा ईश्वराची लीला वाटते. ती ईश्वराला समस्त विश्वाचा आधार असलेले ज्ञानमय, चैतन्यमय आणि आनंदमय तत्त्व मानते.
२ ए १. प्रीती (Love) : हा स्तर व्यक्तीमधील निरपेक्ष प्रेम दर्शवतो. व्यक्तीमधील ‘मी-तूपणा’चा भाव न्यून होतो. ती इतरांशी समरस होते. तिच्यात करुणा, क्षमाशीलता, समावेशकता आणि निरपेक्षता असते. तिला सर्व विश्व तिचे वाटते. तिला सर्व विश्व म्हणजे ईश्वराच्या प्रेमाचे प्रकटीकरण वाटते.
२ ए २. आनंद (Bliss) : हा स्तर आनंदाची अवस्था दर्शवतो. हा आनंद व्यक्तीला आत्म्याशी संलग्न झाल्यामुळे मिळत असतो. हा आनंद उत्स्फूर्त आणि तृप्तीदायक असतो. या स्तरावर मायेची आसक्ती गळून पडते. व्यक्तीला सर्वकाही ईश्वरमय दिसते. तिला जीवन, म्हणजे ईश्वराची लीला वाटते.
२ ए ३. शांती (Peace) : या स्तरावरील व्यक्तीच्या चित्तातील सर्व संस्कार, इच्छा, भावना इत्यादींचा लय होतो. तिला गहन शांतीची अनुभूती येते. ती वर्तमानात जगते. तिचे स्वतःचे असे वेगळेपण रहात नाही. तिचे शरीर, मन आणि बुद्धी हे ईश्वराचे माध्यम बनतात.
२ ए ४. आत्मानुभूती (Enlightenment) : या स्तरावर व्यक्ती अद्वैताची अनुभूती घेते. तिची जाणीव ईश्वराच्या जाणिवेशी एकरूप होते. तिला कशातही भेद दिसत नाही. तिला सर्वत्र एकच चैतन्य दिसते. तिला स्वतःच्या अस्तित्वाचीही वेगळी जाणीव नसते. तिची सर्व संचित कर्मे लय पावतात. तिचा देह प्रारब्धानुसार चालतो आणि अंतःकरण ईश्वरी प्रेरणेनुसार कार्य करते.
२ ऐ. आध्यात्मिक स्तर हा ग्रहांच्या पलीकडे असणे : प्रीती, आनंद, शांती आणि आत्मानुभूती हे जाणिवेचे स्तर ग्रहांच्या पलीकडे आहेत. चित्तातील वृत्ती शांत झाल्यानंतरच व्यक्ती या स्तरांवर पोचते. कुंडलीतील ग्रहयोग हे व्यक्तीच्या चित्तवृत्तींशी संबंधित आहेत. त्यामुळे प्रीती, आनंद, शांती आणि आत्मानुभूती या स्तरांशी संबंधित ग्रहयोगांचे विवेचन येथे दिलेले नाही.

३. जाणिवेच्या स्तरांशी संबंधित काही तथ्ये

३ अ. जाणिवेच्या स्तरांनुसार व्यक्तीची सूक्ष्म ऊर्जा (प्रभावळ) असणे : व्यक्तीची जाणीव ज्या स्तरावर असते, त्या स्तरानुसार तिच्यातून विशिष्ट प्रकारची सूक्ष्म ऊर्जा प्रक्षेपित होत असते. या सूक्ष्म ऊर्जेला आपण व्यक्तीची ‘प्रभावळ’ म्हणतो.
३ अ १. दुःखप्रधान स्तर : या स्तरावरील व्यक्तीच्या प्रभावळीतील ऊर्जेत तामसिकता आणि जडत्व असते. त्यामुळे अशा व्यक्तीच्या जवळ गेल्यावर डोके जड होणे, निरुत्साह वाटणे, न सुचणे इत्यादी त्रासदायक अनुभव येतात.
३ अ २. विकासप्रधान स्तर : या स्तरावरील व्यक्तीच्या प्रभावळीत राजसिक-सात्त्विक ऊर्जा असल्याने अशा व्यक्तीच्या जवळ गेल्यावर उत्साही आणि प्रेरणादायी वाटते.
३ अ ३. आध्यात्मिक स्तर : या स्तरावरील व्यक्तीच्या प्रभावळीतील ऊर्जेत सात्त्विकता आणि हलकेपणा असतो. अशा व्यक्तीच्या जवळ गेल्यावर मन स्थिर होणे, शांत वाटणे, भावजागृती होणे इत्यादी अनुभूती येतात.
३ आ. जाणिवेच्या स्तरांनुसार व्यक्तीचे इतरांशी जुळणे किंवा न जुळणे : जाणिवेचे समान स्तर असलेले लोक एकमेकांच्या संपर्कात सहजतेने येतात, उदा. विकासप्रधान स्तरावरील लोक हे विकासप्रधान स्तरावरील अन्य लोकांच्या संपर्कात सहजतेने येतात; कारण त्यांची सूक्ष्म ऊर्जा एकमेकांना पूरक असते. त्यामुळे त्यांचे विचार, कृती, मानसिकता, दृष्टीकोन इत्यादी बर्याच प्रमाणात जुळतात.
अहंकारप्रधान स्तरावरील व्यक्ती आणि आध्यात्मिक स्तरावरील व्यक्ती यांचे एकमेकांशी सहसा जुळत नाही; कारण अहंकारी व्यक्ती आत्मकेंद्रित, तर आध्यात्मिक व्यक्ती व्यापक असते. अहंकारी व्यक्तीला आध्यात्मिक व्यक्तीचे विचार अव्यवहारी आणि भ्रामक, तर आध्यात्मिक व्यक्तीला अहंकारी व्यक्तीचे विचार संकुचित अन् स्वार्थी वाटतात.
३ इ. जाणिवेच्या स्तरांनुसार व्यक्तीची क्रियमाण वापरण्याची क्षमता निराळी असणे : जाणिवेच्या स्तरांनुसार व्यक्तीचे क्रियमाण कर्म करण्याची क्षमता पालटते.
३ इ १. दुःखप्रधान आणि अहंकारप्रधान स्तर : या स्तरांवरील व्यक्तींच्या बुद्धीची सात्त्विकता अल्प असल्याने त्यांचे विचार आणि निर्णय हे अधिकतर चित्तातील आवेग, इच्छा, कामना आदींनी प्रभावित असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये क्रियमाण वापरण्याची क्षमता अल्प असते.
३ इ २. विकासप्रधान स्तर : या स्तरावरील व्यक्तीची बुद्धीची सात्त्विकता मध्यम असते. त्यामुळे ती योग्य-अयोग्यचा विचार करून योग्य क्रियमाणाचा वापर करू शकते.
३ इ ३. आध्यात्मिक स्तर : या स्तरावरील व्यक्तीची बुद्धीची सात्त्विकता पुष्कळ असते. त्यामुळे तिचे विचार आणि निर्णय यांमागे अधिकतर ईश्वरी प्रेरणा असते.
४. जाणिवेच्या स्तरांशी संबंधित काही सूत्रे
४ अ. जाणिवेची तात्कालिक स्थिती (state) आणि नेहमीची अवस्था (stage) यांत भेद असणे : ‘मनात एखादी भावना तात्कालिक येणे’ आणि ‘ती भावना मनात नेहमी असणे’ या दोन निराळ्या गोष्टी आहेत, उदा. एखादी गंभीर चूक झाल्यावर मनात अपराधीपणाची भावना उमटणे स्वाभाविक आहे; परंतु ‘मनात नेहमीच अपराधीपणाची भावना असणे’, हे मानसिक स्वास्थ्यासाठी हानीकारक आहे. या लेखात दिलेले विविध स्तर हे जाणिवेची तात्कालिक स्थिती (state) नसून नेहमीची अवस्था (stage) दर्शवतात.
४ आ. व्यक्तीमध्ये एकाच वेळी विविध स्तर कार्यरत असू शकणे : ‘व्यक्ती एका वेळी एकाच स्तरावर असते’ असे नाही, तर तिच्यात विविध स्तर एकाच वेळी कार्यरत असू शकतात, उदा. एकीकडे व्यक्तीमध्ये ‘ज्ञान’ हा स्तर, तर दुसरीकडे ‘अभिमान’ हा स्तर कार्यरत असू शकतो. एकीकडे ‘धैर्य’ हा स्तर, तर दुसरीकडे ‘लालसा’ हा स्तर कार्यरत असू शकतो. चित्तातील संस्कार न्यून झाल्यावरच व्यक्तीला दुःख आणि अहंकार या स्तरांपासून मुक्ती मिळते.
५. स्वतःची सर्वांगीण उन्नती होण्यासाठी पुढच्या पुढच्या स्तरांवर मार्गक्रमण करणे आवश्यक असणे
कनिष्ठ स्तराकडून उच्च स्तराकडे जाणे, हे आपल्या जीवनाचे ध्येय आहे. विकासप्रधान आणि आध्यात्मिक स्तर हे आपल्या जीवनात उन्नती, सुसंवाद, आनंद आणि पूर्णता आणतात. ते आपला दृष्टीकोन व्यापक बनवतात. यासाठी आपण जाणिवेच्या ज्या स्तरावर आहोत, त्याच्या पुढच्या स्तरावर जाण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. स्वतःच्या सद्यःस्थितीविषयी जागरूकता (ज्ञानशक्ती), स्वतःला पालटण्याची तळमळ (इच्छाशक्ती) आणि पालट घडवण्यासाठी सततचे प्रयत्न (क्रियाशक्ती) यांद्वारे आपण जाणिवेच्या पुढील स्तरांवर मार्गक्रमण करू शकतो.’
(समाप्त)
– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२.६.२०२६)
प्रेमप्रकरण कि हृदयातील कपट ?
डेन्मार्कला जे जमले, ते भारताला जमेल का ?
मंदिरकेंद्रित प्राचीन भारताची आदर्श अर्थव्यवस्था !
लसिका प्रणाली पूर्णपणे सक्रीय ठेवण्यासाठी केवळ दाब देण्यापेक्षा नियमित आणि योग्य पद्धतीने व्यायाम करणे आवश्यक !
प्राध्यापिका वेंडी डॉनिगर यांच्याकडून हिंदु धर्मग्रंथ, देवता, प्रतिके यांचे ‘फ्रॉईडीय मनोविश्लेषणा’च्या घातक पद्धतीतून श्रद्धाहनन !
नियमित साधनेने मनाची शुद्धी, योग्य निर्णयक्षमता आणि अंतर्मनातील स्पष्टता वाढते ! – शॉन क्लार्क, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय