PM Modi Australia Visit : ऑस्ट्रेलिया भारताला युरेनियम पुरवणार !

भारताच्या महत्त्वकांक्षी गगनयान मोहिमेला साहाय्य करणार

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील युरेनियम करारावर दोन्ही देशांनी मोहोर उमटवली. शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी बैठकीनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी संरक्षण, व्यापार, ऊर्जा, अवकाश आणि महत्त्वपूर्ण खनिजे यांसह अनेक क्षेत्रांत करार झाल्याची घोषणा केली. भारत सध्या ४ देशांकडून युरेनियम खरेदी करतो. आता त्यात ऑस्ट्रेलिया या पाचव्या देशाचा समावेश झाला आहे. अणूऊर्जा आणि बाँब या दोन्हींसाठी युरेनियम आवश्यक असते.

भारताच्या स्वच्छ ऊर्जा मोहिमेला बळकटी मिळेल ! – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘‘ऑस्ट्रेलियाकडून भारताला युरेनियम मिळाल्याने भारताच्या स्वच्छ ऊर्जा मोहिमेला बळकटी मिळेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया मिळून ‘क्रिटिकल मिनरल्स कॉरिडॉर’देखील विकसित करतील. ‘क्रिटिकल मिनरल कॉरिडोर’ हा ओडिशा, केरळ, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू या किनारी राज्यांमध्ये दुर्मिळ खनिजांचा अखंड पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी विकसित केला जात आहे. कोकोस (कीलिंग) बेटावर ‘स्पेस ट्रॅकिंग टर्मिनल’ (भारताच्या गगनयानाशी संपर्क ठेवण्यासाठी उभारण्यात येणारे तात्पुरते स्टेशन) उभारले जाईल.’’ यामुळे भारताच्या महत्त्वकांक्षी गगनयान मोहिमेलाही साहाय्य होणार आहे.’’

दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतील ! – ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज म्हणाले, ‘‘आतापर्यंत दोन्ही देशांच्या पुरवठा साखळ्या जोडलेल्या होत्या; पण आमची धोरणे वेगवेगळी होती. आजचा हा निर्णय ती दरी मिटवण्याच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे. आज आम्ही वर्ष २०१५ मधील भारत-ऑस्ट्रेलिया अणूसहकार्य करारांतर्गत भारताला युरेनियम निर्यातीच्या व्यवस्थेवर स्वाक्षर्‍या केल्या आहेत. आम्ही दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी सातत्याने काम करत आहोत.’’