२३ वर्षे अखंड व्रत जपत ‘पितांबरी परिवारा’चे सेवापथक विठ्ठलभक्तांच्या सेवेसाठी मार्गस्थ !

पितांबरी आस्थापनाचे सेवापथक पंढरपूरकडे प्रस्थान करतांना उपस्थित सेवेकरी

ठाणे, ९ जुलै (वार्ता.) – ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले; तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा’ या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या वचनाचा आणि हिंदु संस्कृतीतील ‘अतिथी देवो भव ।’ या मूल्याचा आदर्श प्रत्यय ‘पितांबरी परिवारा’च्या वतीने दिला जात आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणार्‍या लाखो विठ्ठलभक्त वारकर्‍यांसाठी ‘पितांबरी परिवारा’च्या वतीने गेली सलग २३ वर्षे निःस्वार्थ भावनेने विनामूल्य मालिश सेवेचे व्रत चालवले जात आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ९ जुलै या दिवशी ठाणे येथून पितांबरी आस्थापनाच्या सेवापथकाने पंढरपूरकडे प्रस्थान केले.

प्रस्थानापूर्वी हिंदु धर्मशास्त्रातील विधीनुसार आस्थापनाचे उपाध्यक्ष 

श्री. परीक्षित प्रभुदेसाई आणि संचालिका सौ. प्रिया प्रभुदेसाई यांच्या शुभहस्ते विधीवत् पूजा करून अन् श्रीफळ वाढवून मार्गस्थ होणार्‍या वाहनाचे पूजन अन् पथकाचे औक्षण करण्यात आले. या प्रसंगी त्यांनी संपूर्ण सेवापथकाला शुभेच्छा दिल्या. ‘वारकर्‍यांची सेवा करणे, हीच खरी आणि श्रेष्ठ विठ्ठलसेवा आहे’, अशी भावना त्यांनी व्यक्त केल्या. या दिव्य सेवेची संकल्पना डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या प्रेरणेतून साकार झाली आहे. यंदा पितांबरीचे उपाध्यक्ष श्री. परीक्षित आणि सौ. प्रिया प्रभुदेसाई हे स्वतः पुणे ते सासवड या अवघड घाटाच्या टप्प्यात वारीत पायी चालणार आहेत.

‘क्युअरऑन’ तेलाद्वारे वारकर्‍यांच्या चरणांची विनामूल्य सेवा !

१० ते २८ जुलै या कालावधीत पंढरपूर क्षेत्री येणार्‍या लाखो वारकरी भाविकांसाठी ‘पितांबरी आस्थापना’च्या ‘क्युअरऑन’ वेदनाशामक तेलाद्वारे विनामूल्य मालिश सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.