सांगली जिल्हा बँक नोकर भरतीवरील स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाकडून रहित !

गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत

सांगली – सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४४४ कनिष्ठ लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेला राज्य सरकारने दिलेली स्थगिती उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर ‘सर्किट बेंच’ने उठवली आहे. (‘सर्किट बेंच’ म्हणजे न्यायालयाचे एक तात्पुरते ठिकाण, जेथे उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती ठराविक कालावधीत येऊन खटले (प्रकरणे) चालवतात.) न्यायालयाने ही भरती प्रक्रिया पूर्ववत् चालू ठेवण्याचे आदेश दिले असून यामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेकडो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी या भरतीप्रक्रियेवर आक्षेप घेत स्थगितीची मागणी केली होती. त्यानुसार सहकार विभागाने २ जुलै या दिवशी आगामी निवडणुकांचे कारण पुढे करत या भरतीला स्थगिती दिली होती. या आदेशाच्या विरोधात बँक व्यवस्थापनाने कोल्हापूर खंडपिठात याचिका प्रविष्ट केली होती.