US Iran War : अमेरिकेच्या आक्रमणांना इराणचे जोरदार प्रत्युत्तर

अमेरिकेच्या कतार, कुवेत, बहरीन येथील तळंवर आक्रमणे

तेहरान (इराण) – अमेरिकेने इराणवर केलेल्या आक्रमणांना इराणने कतार, कुवेत आणि बहरीन या देशांतील अमेरिकेच्या तळांवर ड्रोनद्वारे आक्रमण करून अवघ्या २४ घंट्यांच्या आत अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. इराणी सैन्याने दिलेल्या माहितीनुसार या आक्रमणांमध्ये कुवेतमधील ‘पॅट्रियट’ क्षेपणास्त्र प्रणाली, कतारमधील ‘अर्ली वॉर्निंग सॅटेलाइट अँटिना’ला आणि बहरीनमधील अमेरिकी सैन्याची इंधन टाकी यांना लक्ष्य करण्यात आले. या आक्रमणांसाठी मोठ्या संख्येने ड्रोनचा वापर करण्यात आला. ‘अमेरिकेने आमच्यावर आक्रमण केल्यास आम्ही तिला प्रत्युत्तर देणारच’, अशी चेतावणी इराणच्या संसदेचे अध्यक्ष महंमद बागेर गालिबाफ यांनी दिली. ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी (दोन जलाशयांना जोडणारा जलमार्ग) अमेरिकेच्या दबावाखाली नव्हे, तर इराणच्या अटींवरच उघडली जाईल’, असेही त्यांनी स्पष्ट केले.