अटक केलेल्या भाऊसाहेब चव्हाण अधिकार्‍याला बडतर्फ करू !

नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील लाच प्रकरण

मुंबई, ९ जुलै (वार्ता.) – नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात झालेल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब तुकाराम चव्हाण याला अटकेच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले आहे. त्याला सेवेतून बडतर्फ करण्याविषयीची माहिती शिक्षण आयुक्तांकडून घेऊन बडतर्फ करण्याचा सकारात्मक विचार करू, असे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले. शिवसेनेच्या सदस्या डॉ. नीलम गोर्‍हे यांनी ‘नाशिक जिल्हा परिषदेतील गटक्षिणाधिकारी आणि ३ जणांना लाच घेतांना अटक केल्याविषयी’चा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील प्राथमिक कनिष्ठ लेखाधिकारी देविदास पाटील आणि पंचायत समिती दिंडोरी येथील प्राथमिक शिक्षक नीलेश भारती यांनाही सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

अपक्ष सदस्य सत्यजित तांबे यांनी उपप्रश्न उपस्थित केला, मागील वेळी लाच घेतांना अटक केलेला आणि निलंबित केलेला हा अधिकारी पुन्हा सेवेत कसा येतो ? त्याला कुणी नियुक्त केले ? याची चौकशी झाली पाहिजे ? ती तुम्ही करणार का ? आणि आयुक्त सूरज मांढरे यांनी दिलेल्या सूचीचे काय झाले ? असा प्रश्न उपस्थित केला.

मंत्री भोयर म्हणाले, ‘‘तत्कालीन आयुक्त सूरज मांढरे यांनी राज्यातील शिक्षण विभागातील भ्रष्ट अधिकार्‍यांच्या नावांची सूची दिली आहे, त्याची माहिती घेऊन पटलावर ठेवण्यात येईल.’’