तुळजापूर येथील ४ सहस्र एकर भूमी घोटाळ्याची चौकशी करा !- अंबादास दानवे, आमदार, ठाकरे गट

मुंबई, ९ जुलै (वार्ता.) – तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथील तब्बल ४ सहस्र एकर भूमी अनधिकृतपणे लाटण्यात आली असून ही हडपलेली भूमी सरकारने त्वरित कह्यात घ्यावी, अशी मागणी विधान परिषदेतील ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी ९ जुलै या दिवशी विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावात केली.

ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे म्हणाले की, तुळजापूर परिसरातील भूमींच्या व्यवहारात मोठा अपव्यवहार झाला आहे. ही सहस्रो एकर भूमी नियमबाह्य पद्धतीने लाटली गेली आहे. ही सर्व भूमी गरीब आणि देवस्थान यांची असू शकते. सरकारने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून ती भूमी देवस्थानाला परत मिळवून द्यावी.

भूमी आणि मालमत्ता यांच्या खरेदी-विक्री व्यवहारात मोठ्या प्रमाणावर मुद्रांक शुल्क (स्टँप ड्युटी) चोरी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असून अधिकारी आणि भूमाफिया यांच्या संगनमताने हा प्रकार चालू असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.