जंजिरा गडावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवण्याच्या मागणीसाठी ‘सह्याद्री प्रतिष्ठान’चे मुंबईत तीव्र आंदोलन !


मुंबई, ९ जुलै (वार्ता.) –
रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक जंजिरा गडावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवण्यास अनुमती द्यावी, या प्रमुख मागणीसाठी ‘सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान’च्या वतीने प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ९ जुलै या दिवशी शीव येथील ‘केंद्रीय पुरातत्व विभागा’च्या कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यापूर्वी प्रतिष्ठानने तशी मागणी करूनही ‘केंद्रीय पुरातत्व विभागा’ने ती मागणी नाकारली होती. त्यामुळे दुर्गसेवक आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्यामध्ये अप्रसन्नता होती.

मुसळधार पावसाची पर्वा न करता राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने दुर्गसेवक मुंबईत आले होते. या वेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. प्रतिष्ठानच्या शिष्टमंडळाने केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांची भेट घेतली आणि जंजिरा गडावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवण्यास अनुमती देण्याविषयीचे निवेदन संबंधित अधिकार्‍यांना दिले. शिष्टमंडळ आणि अधिकारी यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर या विषयावर सकारात्मक भूमिका घेऊन कायदेशीर चौकटीत योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन अधिकार्‍यांनी दिले.

‘सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान’च्या माध्यमातून गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील गडांचे संवर्धन, स्वच्छता, जतन आणि ऐतिहासिक वारसा जपण्याचे कार्य सातत्याने केले जात आहे.